Friday, August 15, 2025

उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्यांक व अमराठी भाषिक विरोधी श्री राज ठाकरे यांचे सोबत युती करू नये -अपदस्थ शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांचे मागणीपत्र

प्रेस नोट


शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्यांक व अमराठी भाषिक विरोधी अजेंडा चालविणाऱ्या श्री.राज ठाकरे यांचे सोबत युती करू नये !

-अपदस्थ शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांचे उघड पत्र !


===========================================================


संदर्भ -मनसे युती /२०२५ निवडणूक                                दिनांक - १६ ऑगस्ट २०२५

 प्रिय सखा श्री उद्धवजी साहेब 

सप्रेम जय महाराष्ट्र ! 

विषय-भाषावाद~प्रांतवाद करून अमराठी व अन्य अल्पसंख्यांक भाषिक समाजाच्या विरोधात सातत्याने विष ओकणाऱ्या मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांचे सोबत युतीचा पुनर्विचार करणे बाबत...!

आदरणीय साहेब ,

गेल्या सहा वर्षापासून शिवसेनेचा एक पाईक म्हणून मी माझ्या वतीने पूर्ण निष्ठा व इमानदारीने आपला मोर्चा सर्वत्र सांभाळत आहे. मला जे पटले नाही ते मी आपणा समक्ष उघड पणे व्यक्त केले, त्याचा विपरीत परिणाम सुद्धा मला भोगावा लागला, पण त्याची तमा न बाळगता माझे कर्तव्य मी अव्याहत बजावत असून शिवसेनेची बाजू सर्वच ठिकाणी सातत्याने पूर्ण ताकदिनिधी, कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता, सतत मांडत आहे. याची आपण नेहमी प्रशंसा केली आहे. गेल्या ३० वर्षां पासून एक चळवळीचा आंदोलक कार्यकर्ता म्हणून मी माझे संपूर्ण आयुष्य गोरगरीब शेतकरी, शेतमजूर,आदिवासी व अल्पसंख्यांक लोकांच्या सेवेत घालविले आहे आणि त्याच कारणांनी आपण मला शिवबंधन बांधून काम करण्याची संधी दिली होती, ती मी पूर्ण निष्ठेने पार पाडीत आहे, त्याचे आपण साक्षीदार आहात.

आज मी हे पत्र विशेष रूपाने आपणास लिहिण्याचे कारण की महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होऊन या निवडणुका एकत्रित लढविल्या जातील, अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात येत आहे. पण ही युती येत्या काळात आपल्या शिवसेनेला कशी विघातक ठरणार आहे व त्यामुळे आपले कसे अतोनात नुकसान होऊ शकते, हे आपणास कळविण्यासाठी मी हे पत्र आपणास लिहीत आहे .

सर्व देश जाणतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज साहेब ठाकरे हे गेल्या कित्येक वर्षापासून भाषावाद~प्रांतवाद करून हिंदी व अन्य अल्पसंख्यांक भाषिक आणि मुस्लिम नागरिकांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करीत आहेत, त्यामुळे राज्यातील व खासकरून मुंबई आणि मुंबई जवळील दहा महानगरपालिका क्षेत्रात प्रामुख्याने वास्तव्यात असणारे राज्यातील तीन कोटी पन्नास लाख पेक्षा जास्त हिंदी भाषिक व अन्य भाषिक अल्पसंख्यांक , मुस्लिम~ दलित लोक आपल्या शिवसेने~मनसे च्या या युतीच्या उघडपणे विरोधात जात आहेत.

आपली शिवसेना आज महाविकास आघाडी ~ इंडिया ब्लॉक ची एक प्रमुख घटक असून गेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या आघाडीला भरीव यश मिळाले. विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपल्या शिवसेनेचे जे सर्वाधिक वीस आमदार निवडून आलेत, त्यातील मुंबई महानगरात निवडून आलेले शिवसेनेचे दहा आमदार हे फक्त महाविकास आघाडीला अल्पसंख्यांक हिंदी ~ मुस्लिम ~ दलित व बहुजन मतदारांनी भरीव मतदान केल्यानेच शक्य झाले आहे. परंतु आता मनसे प्रमुख श्री राज साहेब ठाकरे हे अमराठी जनतेचा द्वेष करून हिंदी व अन्य अल्पसंख्यांक भाषिक आणि मुस्लिम नागरिकांच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करीत असल्याने, महाविकास आघाडी च्या एकगठ्ठा मतदारांत कमालीचे नैराश्य निर्माण झाले असून आज संपूर्ण राज्यासह मुंबई व मुंबई जवळील दहा महानगरपालिका क्षेत्रात प्रामुख्याने वास्तव्यात असणारे बहुसंख्य हिंदी भाषिक व अन्य भाषिक अल्पसंख्यांक, मुस्लिम~दलित लोक आपल्या शिवसेनेच्या या युतीच्या उघडपणे विरोधात जात आहेत.त्याचा फटका आपल्या शिवसेनेसह संपूर्ण महाविकास आघाडीला सुद्धा बसणार असून ही फार चिंतेची बाब आहे. शिवसेनेचा एक पाईक म्हणून ही वस्तुस्थिती आपल्या समक्ष वेळीच मांडणे मी माझे कर्तव्य समजून हे पत्र आपणास लिहीत आहे.

आपणास कल्पना आहेच की महाविकास आघाडी~इंडिया ब्लॉक चा प्रमुख कणा असलेला हिंदी व अन्य भाषिक अल्पसंख्यांक,मुस्लिम~दलित मतदार हा मनसे प्रमुख श्री राज साहेब ठाकरे यांच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या हिंदी व अन्य अल्पसंख्यांक नागरिकांच्या विरोधात गरळ ओकून सातत्याने करीत असलेल्या वक्तव्याने व्यथित असून त्यांचे वर होणारे हल्ले व दिल्या जाणारी हीन~अपमानास्पद वागणूक, या मुळे आज कमालीचा नाराज असून याचा फायदा भाजपा युतीला आयता होत आहे. ही दुर्दैवी स्थिती थांबविण्या साठी मनसे प्रमुख श्री राज ठाकरे यांचेशी हातमिळवणी करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात यावा, ही काळाची गरज आहे. कारण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी व आपल्या शिवसेनेला चालून आलेली खूप मोठी संधी श्री राज साहेब ठाकरे यांचे हिंदी भाषिक व मुस्लिम विरोधी कलुशीत संकुचित वक्तव्याने हिरावली जाणार तर नाही, या भीतीची वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे.

या साठी माझी आपणास विनंती की हिंदी व अन्य अल्पसंख्यांक भाषिक आणि मुस्लिम नागरिकांच्या विरोधात सातत्याने होणारे वक्तव्य थांबविण्यात यावेत आणि महाविकास आघाडी ~ इंडिया ब्लॉक चा प्रमुख कणा असलेला हिंदी भाषिक व अन्य भाषिक अल्पसंख्यांक , मुस्लिम~दलित मतदार हा मनसे नेते राज ठाकरे यांचे सतत गरळ ओकून करीत असलेल्या वक्तव्याने आणि त्यांच्यावर होणारे हल्ले व दिल्या जाणारी हीन~अपमानास्पद वागणूक मुळे दुरावला जाणार नाही, यासाठी वेळीच उपाययोजना करावी, ज्या मुळे माझ्या सारखे कार्यकर्ते सुद्धा आपल्या शिवसेने पासून दूर जाण्याचा विचार करणार नाही.

त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी आपल्या शिवसेनेची जी युती होत आहे, त्यामुळे मी व माझ्या सारखे अनेक शिवसैनिक व्यथित झालो आहे. कारण भाषावाद~प्रांतवाद पुढे करून निवडणूक डोळ्या समोर ठेवून केलेली कृती, ही देश विघातक ठरणार आहे, हे समजून घेणे अगत्याचे झाले आहे.

करिता हे विशेष पत्र .....

यावर उघड चर्चा व्हावी ही माझी स्पष्ट भूमिका आहे.

आदेश व्हावा ......

आपला प्रतिक्षारत पाईक,


किशोर तिवारी 

(अपदस्थ शिवसेना प्रवक्ते)

मोबाईल : 9422108846

Email ID : kishortiwari@gmail.com


====================================

No comments:

Post a Comment