शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका-१० सप्टेंबरपासून विदर्भ जन आंदोलन समितीच्यावतीने शेतकरी संवाद यात्रोचे आयोजन
यवतमाळ-
दरवर्षीच येणार्या कृषी संकटाने विदर्भातील शेतकरी त्रस्त झाला आहे. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटांचा तो बळी ठरत आहे. त्याला धीर देणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकर्यांच्याच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आता लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील २00 गावांमध्ये शेतकरी संवाद यात्रोचे आयोजन १0 सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. शेतकर्यांनो, आता आत्महत्या करू नका, असा संदेश या यात्रेमधून देण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते किशोर यांनी दिली आहे.
संपूर्ण विदर्भात यावर्षी ६0९ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वांत जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. मात्र कोणताही मंत्री व आमदार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील ५ लाख शेतकर्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
ज्या यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील २00 खेड्यांमध्ये मागील ३ महिन्यात आत्महत्या झाल्या आहेत, त्या सर्व ठिकाणी भेटी देण्यासाठी व शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी येत्या १0 सप्टेंबरपासून 'संवाद यात्रा' काढण्याची घोषणा विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. या संवाद यात्रेत विदर्भातील सर्व स्तरातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी नेते व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
कृषी संकटावर आत्महत्या हा पर्याय नसून शेतकर्यांनी या संकटाचा सामना करावा, असे आवाहन शेतकर्यांना केले जाणार आहे. शिवाय सरकारची अन्नसुरक्षा योजना, आरोग्य व शेतीसाठी लागणारा वित्तपुरवठा या सारख्या महत्वाच्या विषयांवर शेतकर्यांशी संवाद साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न या यात्रेतून केला जाणार आहे. आमदार व खासदारांनी राजकारण हा धंदा केला आहे. सर्व कंत्राट व शासकीय योजनांची लूट करण्यात ते व्यस्त आहे. त्यांच्या पोटभरू नितीमुळे सरकारी यंत्रणा अनियंत्रीत झाली आहे.
परप्रांतातून आलेल्या सनदी अधिकार्यांना येथील शेतकर्यांच्या दु:खाची जाणीव नाही. ते मंत्री, आमदार व खासदार यांच्या आदेशाला जुमानत नाहीत. तर नापिकी व पूरग्रस्त शेतकर्याला बँकेने कर्ज दिले नाही तर दवाखान्यात औषधे मिळत नाही. मुलांच्या शिक्षणाला पैसा नाही. मागील १ वर्षापासून ग्रामीण जनतेला रोजगार नाही. या शेतकर्यांच्या वेदना हे सनदी अधिकारी समजू शकत नसल्याची खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
वर्षभरात १४८ शेतकर्यांच्या आत्महत्या
विदर्भात नापिकी व पूरग्रस्त शेतकर्यांच्या आत्महत्या थांबायचे नाव घेत नाही. यंदा झालेल्या अतवृष्टी आणि संततधारमुळे शेतजमीनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून खरीप हंगाम हातचा गेला आहे. भविष्याची चिंता सतावत असल्याने व पोळय़ाला आपल्या परिवारातील सदस्यांसाठी काहीही करता येत नसल्याची भावना मनात घर केल्याने जिल्ह्यातील ३ शेतकर्यांनी १२ तासात आपली जीवनयात्रा संपविली आहे.
पोळा या सणाला शेतकर्यांच्या जीवनात फार महत्त्व आहे. या दिवशी बैलांना सजवुन त्यांना पोळय़ात नेणे त्यांचा शृंगार करणे आणि पुरणपोळीचा नैवैद्य देणे, तुपाने त्यांचे खांद शेकणे आदी पारंपारिक गोष्टींची पूर्तता शेतकरी करीत असतो. यंदा दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला कर्जबाजारीपणामुळे कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण झाले असतांना. पोळय़ासाठी आणि आपला सखा सोबती असलेल्या बैलांसाठी काहीच करता येत नसल्याचे शल्य बोचत असल्याने ऐन पोळय़ाच्या पर्वावर जिल्ह्यातील पाथरी येथील नागोराव सोयाम, पिंपळापूर येथील सदाशिव कनाके व राजुरवाडी येथील महादेव सुरपाम या तीन शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडून आपली जीवनयात्रा संपविली आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील खैरखेड येथील सज्रेराव साळवे व संगीता साळवे या दोन शेतकरी दाम्पत्यांनी जीवनयात्रा संपविल्याची घटना नुकतीच घडली आहे. शेतकरी ऐन पोळय़ाच्या पर्वावरच का आत्महत्या करतात हा चिंतनाचा विषय असल्याची प्रतिक्रिया शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
सध्या विदर्भावर प्रचंड कृषी संकट आले असून शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटापुढे हतबल झाले आहे. शासनाकडून कुठलिच मदत न मिळाल्याने शेतकर्यांचे जगणे कठीण झाले आहे. तर नवीन पीक कर्ज देण्यास बँकानी नकार दिल्यामुळे व सावकारांनी पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या होत असून या आठ दिवसात आतापर्यंत ११ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची माहिती तिवारी यांनी दिली आहे
यवतमाळ जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या सरकारी आकडेवारीनुसार मागील ३ महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात ५८ शेतकर्यांनी तर संपूर्ण वर्षात १४८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. सरकारने २ हजार कोटींची मदत घोषित केली आहे. परंतु ती अद्याप शेतकर्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. तर बॅंकांनी शेतकर्यांना नवीन पीक कर्ज देणे बंद केले असून जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतरही जुन्या पाच शेतकर्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. या परिस्थितीवर मार्ग काढणे गरजेचे आहे.
शेतकर्यांनी आत्महत्या न करता आपल्या हातात मशाली घेऊन भ्रष्ट राज्यकर्त्यांना व मस्तवाल अधिकार्यांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहन या संवाद यात्रेतून शेतकरी बांधवांना करण्यात येणार असल्याची माहितीही तिवारी यांनी दिली.
=================================================
No comments:
Post a Comment