Monday, August 26, 2013

पीक कर्जासाठी डफडे आंदोलन-शेतकरी विधवांनी केली अर्थमंत्र्यांच्या प्रतिमेची पूजा


 
पीक कर्जासाठी डफडे आंदोलन-शेतकरी विधवांनी केली अर्थमंत्र्यांच्या प्रतिमेची पूजा
-






तालुक्यातील पारवा येथील स्टेट बँकेसमोर देशाचे अर्थमंत्री पी. चिदंम्बरंम यांच्या प्रतिमेची पूजा व आरती करून शेतकरी विधवांनी गांधीगिरी करीत आज दुपारच्या सुमारास आंदोलन केले. शेकडो शेतकर्‍यांनी यावेळी आम्हाला नव्याने पीक कर्ज देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष व शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्या नेतृत्वात 'डफडे वाजवा' आंदोलन करून बँक व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न केला. या अभिनव आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष्य वेधले आहे.
संपूर्ण विदर्भात या वर्षी सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना पीक कर्जाचे वाटप करण्यास टाळाटाळ केल्यामुळे लाखो शेतकर्‍यांवर सावकाराचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.
या सर्व शेतकर्‍यांना आत्महत्येसारख्या संकटातून वाचविण्यासाठी केंद्र सरकारने नव्याने पीककर्ज द्यावे, असा एकमुखी ठराव आंदोलनादरम्यान घेण्यात आला आहे. तसेच देशाचे अर्थमंत्री पी. चिदंम्बरम यांची ओवाळणीही करण्यात आली. शेतकर्‍यांच्या या ठरावाचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंम्बरम यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले.
यावेळी किशोर तिवारी म्हणाले की, यंदा तोटा कमी करण्यासाठी स्टेट बॅंकेने मागील तीन वर्षाच्या थकित कर्जाचे खांदेपालट केले. शेतकर्‍यांची जमिनी गहाण ठेवून पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यायांची दहा लाख रुपयांची जमीन बॅंकेच्या १0 हजाराच्या कर्जावर गहाण झाली आहे.
कर्जापेक्षा जास्त गहाण खतासाठी स्टॅम्पचा खर्च शेतकर्‍यांना भरावा लागला. आता, मात्र त्या शेतकर्‍यांना बॅंक कर्ज देत नाही आणि जिल्हाधिकारी काहीच करू शकत नाही, अशी विदारक परिस्थिती संपूर्ण विदर्भात निर्माण झाली आहे. त्यामुळे 'डफडे वाजवा' आंदोलन करूनही बँकेचे अधिकारी जागणार नसतील तर आम्ही यापुढे 'बदडा' आंदोलन करू, असा इशारा किशोर तिवारी यांनी दिला आहे. 
पिंपरी (रोड) येथील सरपंच भिसेन गेडाम हे भारतीय स्टेट बँकेच्या पांढरकवडा शाखेत गेली दोन महिन्यांपासून चकरा मारत आहेत. कवठा येथील भूमन्ना चिट्टलवार यांना पाटणबोरी शाखेने अजूनपर्यंत पीककर्ज दिले नाही. नागेझरी येथील किशोर हेमके यांना पारवा शाखेने नोव्हेंबरमध्ये कर्ज देण्यात येईल, असे सांगितले. जिल्ह्यातील शेकडो पात्र बचत गटांना नवीन पीककर्ज देण्यास स्टेट बँकेने नकार दिला आहे.
एकीकडे महाराष्ट्र सरकार पूरग्रस्तांना दोन हजार कोटींचे पॅकेज देत आहे तर दुसरीकडे स्टेट बँक पात्र शेतकर्‍यांना कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेची पूजा व आरती करून आंदोलनाला सुरुवात झाली. डफडे वाजवा आंदोलन करूनही बँकेचे अधिकारी जागणार नसतील तर तीव्र आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा किशोर तिवारी यांनी यावेळी दिला.
शेतकरी नेते किशोर तिवारी, तुकाराम मोहुर्ले, दत्ता गटलेवार, शेख युसुफखान पठाण, शेख नूर, जि. प. सदस्य तुकाराम मेर्शाम, मोहन जाधव, मोरेश्‍वर वातीले, सुरेश बोलेनवार, अंकीत नैताम, प्रितम ठाकूर, भीमराव नैताम, प्रेम चव्हाण, राजु राठोड, संतोष नैताम, राजु उपलेंचवार, गजानन बोदुरवार, सुधाकर गोहणे, सुनिल राऊत, विलास आत्राम, विलास मांढरे, संदीपसिंग ढालवाले, शंकर अंधेवार, नागोराव येन्नरवार, शंकर गटलेवार, रामदास कुक्कुलवार, नारायण सोमलवार, मुरली वाघाडे, राम मुत्यलवार, अशोक बोमकंटीवार, शेखर जोशी, विठ्ठल चिट्टलवार सामील झाले 



No comments: