ऐन दिवाळीच्या धामधुमीत विदर्भात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या :कापसाच्या व सोयाबीनच्या नापिकीनंतर हमीभावापेक्षा कमी भावाच्या धक्क्याने विदर्भाचे ३० लाख शेतकरी संकटात
विदर्भ -२४ ऑक्टोबर २०१४
एकीकडे सारा देश दिवाळी साजरा करीत होता मात्र यवतमाळ जिल्यातील केळझर येथील राजेन्द्र चहांदे ,उमरी(पाथरी ) चे दत्ता चेडे ,पारवा येथील नागराज महान्डोले व गंगापूरचे अरुणभाऊ करनुले तर अकोला जिल्याचे चिंचोली येथील किसनराव सानप व अमरावती जिल्याचे शेंदूरजनाघाट्चे मनोजभाऊ फुटाणे यांनी नापिकी व कर्जबाजारी पणामुळे आपली जीवनयात्रा संपविल्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांना मात्र 'काळी दिवाळीच ' साजरी करावी लागली ह्या सर्व शेतकऱ्यांनी तिबार पेरणी करून आपले कापुस व सोयाबीनचे पिक उभे केले होते मात्र १५ सप्टेंबर पासून पावसाची दडी, विविध किडींचा प्रकोप आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतच सोयाबीनची पानगळ , कापसाचे बोंडे सडल्यामुळे आणी सध्या कृषी फिडरवरील २२ तासाचे भारनियमन त्यातच कापसाचे भाव रुपये ३५०० तर सोयाबीन रुपये २८०० वर बाजारात कोणीही विकत घेत नसल्यामुळे झाल्या आहेत जर सरकारने तात्काळ मदत व कापसाचा व सोयाबीनचा हमीभाव व त्यावर खरेदी सुरु केली नाहीतर उपासमारीला तोंड देत असलेले शेतकरी आत्महत्या करतील असा गंभीर इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.
खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत व कापसाचे उत्पन्न २०% टक्का होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बरबाद झाले मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ओरड करणारे नेते आता मात्र सत्तेचे वारे लागल्यानंतर साधा फोनही उचलत नाही हि शरमेची बाब आहे ,केंद्र व राज्य सरकार झोपले आहे का असा सवाल ,किशोर तिवारी यांनी केला आहे
एकीकडे भारताच्या पंतप्रधानासह नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा बाजार करीत होते याच दरम्यान विदर्भात नापिकी व कापसाचे व सोयाबीनचे उभे पिक पाण्याने दगा दिल्याने व रोगांचा व कीटकांचा हल्लामुळे तीस लाख हेक्टर मधील नगदी कापसाचे व सोयाबीनचे पिक बुड्याल्यामुळे ६२ कोरडवाहू शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर्षी विदर्भात ९०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकार दरबारी नोंद झाली आहे सरकारने विदर्भातील संकटावर जर लक्ष दिले नाहीतर शेकडो कर्जबाजारी नापिकीग्रस्त कोरडवाहु शेतकरी आत्महत्या करतील असा इशारा विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे
यावर्षी विदर्भात पावसाने २५ ऑगस्टलाच हजेरी लावल्याने व नंतर १७ सप्टेंबर नंतर गायब झाल्यानंतर दुबार-तिबार पेरणी करून थोडा दम धरलेल्या शेतकऱ्यांना भारनियमनाने पार बरबाद केले असून ऐन दिवाळीत शेतकरी व शेतमजुर उपासमारीला तोंड देत असुन दिवाळीसाठी फाटकेतर सोडा सध्या खेड्यात फुटाणे घेण्यासाठीही दमडी नसून या दशकातील हि सर्वात मोठी नापिकी असुन मात्र सरकार व सर्व राजकीय नेते यावर एक शब्दही बोलत नसून अधिकारीमात्र वातानुकुल कक्षात बसून विक्रमी उत्पादनाचे दावे करीत आहेत यावर्षी पहिले गारपीट नंतर पावसाने दगा दिल्याने विदर्भात २० ऑक्टोबर पर्यंत ९००च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जर सरकारने तात्काळ कापसाच्या भावाचा प्रश्न व नापिकीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व मदत घोषित करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी महामहीन राज्यपालांना आहे .
या वर्षी संपूर्ण विदर्भात ३० लाख हेक्टर मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याचा सोयाबीन वर जर खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. येरव्ही सोयाबीनचे ३० किलो बियाणे पेरणी केल्यानंतर आठ ते दहा क्विंटल होणारे उत्पन्न आता केवळ ८० किलोवर आले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यंदा सुरूवातीलाच पावसाने दडी मारली. त्यानंतर सुरळीत पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणी केली मात्र पुन्हा पावसाने दगा दिल्यानंतर अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उशिरा पेरणी झाल्याने आणि वातावरणातील बदलाने उत्पन्नात कमालीची घट झाली. एरव्ही३० किलो सोयाबीन बियाण्याची लागवण केली की त्यापासून आठ ते दहा क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न व्हायचे. मात्र यावर्षी ३० किलोला ८० किलो अशी सोयाबीनची उतारी आहे. त्यातच सोयाबीन काढणीचा खर्च प्रती बॅग १ हजार ५००रुपये झाला आहे. मशीन आणि ट्रॅक्टरचा खर्च एक हजार रुपये असा २ हजार ५०० रुपये खर्च आहे. याव्यतिरिक्त लागवण आणि मजूरीचा खर्च वेगळा असे असताना काढणीचाच खर्च २ हजार ५०० रुपये उत्पन्न मात्र २ हजार रुपये अशी परिस्थिती तालुक्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेकांनी सोयाबीनची ही उतारी पाहून त्यामध्ये जनावरे सोडणेच पसंत केले आहे मात्र अधिकारी सरकारला अंधारात ठेवत आहेत ,असा आरोप तिवारी यांनी केला आहे .
दिवाळी हा सण सर्वांसाठीच महत्वाचा. तीन दिवसांवर हा सण येऊन ठेपला असताना पैशाची तजवीज करण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. नातेवाईक, आप्तेष्ट, सावकारांचे कर्जासाठी उंबरठे झिजविले जात आहे. असे असताना प्रशासनाकडून या गंभीर परिस्थितीची कुठलीही दखल घेतल्या गेली नाही. वास्तविक सोयाबीन पिकाचा आतापर्यंत सर्वे व्हायला हवा होता. तसेच शेतकर्यांना फुल ना फुलाची पाकळी अशी आर्थिक मदत करून त्यांना दिवाळी सणापूर्वी दिलासा द्यायला हवा होता.
विदर्भाचे नगदी पिक कपाशीचे उत्पन्न पाण्याअभावी जाऊ नये म्हणून तालुक्यातील शेतकर्यांनी कर्ज काढून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध केल्या. मात्र भारनियमनाच्या फटक्याने त्या कुचकामी ठरत असून, २० लाख हेक्टर मध्ये कापसाची पेरणी केलेले शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहे. कपाशीचे उत्पन आता एकरी एक ते दोन किंटळचा होणार नाही त्यातच कापसाचा बाजार भाव हमीभावापेक्षा कमी झाला आहे सरकारने तात्काळ कापुस उत्पादक शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी तिवारी यांनी पुन्हा केली आहे .
निसर्गाच्या लहरीपणासोबतच वीज वितरणाचा मनमानी कारभारही शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. सध्या कृषी फिडरवर २२ तासाचे भारनियमन होत आहे. केवळ दोन तास वीज उपलब्ध होत आहे. अशा स्थितीत काही शेतकरी रात्री बे रात्री जाऊन ओलिताचा प्रयत्न करीत आहे. मात्र तेही शक्य होत नाही. वीज वितरणपुढे शेतकऱ्यांनी आता हात टेकले आहे,मात्र शेतकऱ्यांचा . कोणीच वाली दिसत नाही अशा अडचणीत शेतकर्याना फक्त देवच वाचवू शकतो कारण सर्वच नेते शेतकऱ्यांच्या कबरीवर बसून सत्ता काबीज करण्याचा प्रयन्त करीत आहेत याला आता शेतकऱ्यांनीच उत्तर देणे गरजेचे आहे मात्र शेतकरी जाती राजकारणात आंधळा झाल्याची खंत तिवारी यांनी व्यक्त केली .
No comments:
Post a Comment