ओल्या दुष्काळाच्या सावटात भूविकास बँक करणार १४०० कोटींची वसुली-लोकमत
विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी याविरोधात आंदोलनाचा इशारा
(03-10-2010 : 12:33:10)
http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=NagpurEdition-2-1-03-10-2010-2e7ec&ndate=2010-10-03&editionname=nagpur
रूपेश उत्तरवार
यवतमाळ, दि. २ - ओल्या दुष्काळाच्या सावटात राज्यभरातील शेतकऱ्यांना भूविकास बँकेने कर्जवसुलीच्या नोटीस बजाविल्या आहेत. त्यामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये येणाऱ्या पिकातून पैशाची वसुली करण्याचे निर्देश मुंबईच्या शिखर बँकेने दिले आहे. यामुळे राज्यातील शेतकरी धास्तावले आहे.
संपूर्ण राज्यभरात यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे राज्यभरात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अतिपावसाचा पिकांना सर्वाधिक फटका बसला, असे असले तरी शासनाने ओल्या दुष्काळाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही. याच संधीचा फायदा घेत भूविकास बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यना कर्जाची परतफेड करण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. कर्जवसुलीचा संपूर्ण कार्यक्रमच शिखर बँकेने जाहीर केला आहे. त्याच्या अंमलबजावणीचे काम जिल्हा बँकांनी सुरू केले. यामुळे अडचणीत सापडलेले शेतकरी धास्तावले आहे.
सहकार विभागाच्या सूत्रानुसार राज्यात ८९ हजार शेतकऱ्यांकडे चौदाशे कोटी रुपयांची थकबाकी कायम आहे. यामुळे ८९ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांकडून या कर्जाची वसुली करण्याची तयारी भूविकास बँकेने सुरू केली आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना याबाबतच्या नोटीसही बजावण्यास सुरूवात झाली आहे.
मुंबई येथील भूविकास शिखर बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी कापूस पणन महासंघ, साखर कारखाने, बाजार समित्या आणि दूध उत्पादक संघाला देण्याचे निर्देश दिले आहेत. हंगामात येणारा कापूस शेतकऱ्यांनी महासंघाकडे विकल्यानंतर त्यातील काही रक्कम कापण्याचे आदेश देण्यात आले. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी साखर कारखान्यांना बँकेने पत्र बजावले आहे. थकबाकीदार शेतऱ्यांचे पैसे कापण्यास नकार देणाऱ्या साखर कारखान्यांची सहकार आयुक्तांकडे तक्रार करण्याचे आदेश बँकेने दिले आहेत. त्याच प्रमाणे दूध उत्पादक सभासदांकडून वसुली केली जाणार आहे.
कर्जदार शेतकऱ्यांनी बाजार समितीत धान्य नेल्यास त्या ठिकाणी थकबाकीदार शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करण्याचे निर्देश बँकेने दिले आहे. उद्योग, जोडधंदा, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य पालन, मेषपालन शेतकऱ्यांकडून वसुलीचे निर्देश दिले आहे. याच्या नोटीस अनेक शेतकऱ्यांकडे धडकल्या आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
विदर्भात सर्वाधिक चिताजनक स्थिती आहे. त्यात वसुलीचे आदेश निघाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाराशे शेतकऱ्यांकडून सात कोटींची थकबाकी वसुली केली जाणार आहे.
संचालक, कर्मचारी आणि नातेवाईकांकडून होणार वसुली
भूविकास जिल्हा बँकेचे थकबाकीदार संचालक, कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून थकित कर्जाची वसुली करण्याचे निर्देश भूविकासने बजावले आहे.
विदर्भ भूविकास बँक कृती समितीचे अध्यक्ष राहाटे यांनी बँकेच्या धोरणानुसार वसुली करणार असल्याचे मत 'लोकमत'कडे व्यक्त केले. तर विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment