‘आता तूच मुलांचे शिक्षण पूर्ण कर’
तारीख: 24 Dec 2014 21:25:03 |
दुष्काळग्रस्त शेतकर्याचा पत्नीला शेवटचा निरोप
- तांबा गावात शोकाकुल वातावरण
राजू फसाटे
बाभुळगाव, २४ डिसेंबर
आपल्या लाडक्या मुलांच्या भविष्याचे स्वप्न पेरणार्या शेतकर्याला यंदाही पावसाने दगा दिला. दोन एकर कोरडवाहू शेतातील फक्त एकच क्विंटल कापूस घरी आला. घेतलेल्या कर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण पूर्ण होणार की नाही, अशा विंवचनेत सापडलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील तांबा येथील सोमेश्वर कुंडलिक वडे या शेतकर्याने घरीच विषारी द्रव्य घेऊन आपली जीवनयात्रा संपविली अन् जाताजाता आपल्या अर्धांगिनीवर मुलांचे भविष्य सोडून दिले. ‘आता तूच मुलांचे शिक्षण पूर्ण कर’, असे शेवटचे शब्द भ्रमणध्वनीवर उच्चारले आणि प्राण त्यागला.
यवतमाळ जिल्हा कापसासाठी प्रसिद्ध असला तरी अल्प पावसाने या पिकाची पूर्णत: वाट लावली आहे. जिल्ह्यात पैसेेवारी ही पन्नास टक्क्यांपेक्षा कमी निघाली. यात बाभुळगाव तालुक्याची तर ४४ टक्केच आली आहे. तालुक्यातील तांबा येथील सोमेश्वर वडे हे कर्जबाजारीपणा आणि मुलांच्या शिक्षणाच्या काळजीने विवंचनेत सापडले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या रोशन व भूषण या मुलांचे शिक्षण पैशांअभावी अपूर्ण राहते की काय अशा विचाराने ग्रस्त असणार्या सोमेश्वर वडे यांना यावर्षी दुष्काळाने बेजार केले.
शासकीय कोट्यातून नंबर लागलेला मुलगा रोशन हा बुलढाण्याच्या राजर्षी शाहू कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आणि भूषण हा नागपूर येथील वैनगंगा कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या शिक्षणासाठी २०११ मध्ये दोन एकर आणि २०१३ या वर्षात पुन्हा दोन एकर शेती विकली. यंदाचे शिक्षणाचे शेवटचे वर्ष असल्याने फीचे पैसे भरण्यासाठी कुठलीही सोय उपलब्ध नव्हती. शेवटी मुलांच्या खोली भाड्यासाठी घरी असलेली दुचाकी विकण्यात आली.
नापिकीच्या या वर्षात बँकेचे कर्ज फेडणे, मुलांचे शिक्षण पूर्ण करणे यासह घराचा प्रपंच कसा चालवायचा अशा समस्या सोमेश्वर वडेंसमोर निर्माण झाल्या. सोमवार, २२ डिसेंबरला कळंब तालुक्यातील दोनोडा येथील चुलतभावाच्या तेरवीसाठी सहपरिवार गेलेले सोमेश्वर कार्यक्रम आटोपून एकटेच घरी परत आले. भ्रमणध्वनीद्वारे मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास पत्नी आणि दोन्ही मुले यांच्याशी संपर्क साधून आपण अखेरचा निरोप घेत असल्याचे सांगितले. मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी पत्नीवर टाकून, आपली हतबलता व्यक्त करून सोमेश्वर वडेंनी शेवटचा श्वास घेतला.
No comments:
Post a Comment