Monday, June 17, 2013

वेगळ्या विदर्भासाठी आरपारची लढाई हवी!


भारतातील 'बेस्ट सिटी'सहित पाच पुरस्कार जिंकणारे नागपूर हे एकमेव शहर आहे. तसेच जगातील शक्तिशाली व समृद्ध अमेरिकेचादेखील एक पुरस्कार राज्याच्या उपराजधानीने प्राप्त केला आहे. परंतु, नागपूर हेच भारतातील राजधानीचा दर्जा गमावणारे एकमेव शहर होय, हे दुर्दैव म्हणावे लागेल.'सर पे ताज और दिल में आग' असा हा प्रकार आहे. वास्तविक, स्वातंत्र्यानंतर दहा नवी राज्ये व राजधान्या निर्माण झाल्या आहेत. पण नागपूरचे हे वैशिष्ट्य कुणाच्याही वाट्याला आलेले नाही.
प्रत्येकालाच विदर्भ हवाय, पण घरात बसून ! भगतसिंह जन्माला यावा, मात्र तो शेजार्‍याच्या घरी, अगदी तशीच स्थिती वेगळ्या विदर्भ आंदोलनाची झाली आहे. जांबुवंतराव धोटे आणि वेगळय़ा विदर्भाची चळवळ यात एक अतूट नाते आहे. त्यांची आंदोलने, बंद, लाखोंचे मोर्चे, विराट सभा, आजही येथील लोकांच्या मनात ताज्या आहेत. खापर्डेपासून सुरू झालेली 'अणे-बियाणींची ड्राईंग हॉलमधील विदर्भाची चळवळ धोटेंनी रस्त्यावर आणली. आंदोलन पुन्हा उभे राहावे म्हणून 'विदर्भ जनता काँग्रेस'ची स्थापना केली. 'विदर्भ संग्राम परिषदेच्या निमित्ताने सगळय़ांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. जनतेने साथ दिली. परंतु, प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठ फिरवली व आंदोलन शांत झाले.
सन १९५६ - सी.पी. अँन्ड बेरार राज्याची नागपूर राजधानी असलेले द्विभाषिक (मराठी, हिंदी) राज्य तोडून दुसर्‍या द्विभाषिक (मराठी-गुजराती) मुंबई राज्याला जोडण्याची काहीच गरज नव्हती. १९६0 मध्ये विदर्भ-महाराष्ट्राला जोडण्याचीही आवश्यकता नव्हती. दार कमिशन व फाजल अली आयोगाने विदर्भाच्या बाजूने निकाल दिला होता. खुद्द राजीव गांधी 'विदर्भ राज्य' द्यायला तयार झाले होते. या सर्व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याच चुका आहेत व त्या निस्तरण्याची जबाबदारी पक्षप्रमुख म्हणून सोनिया गांधी यांचीच आहे. विविध राजकीय पक्षांची झूल बाजूला ठेवत, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सोनिया गांधी यांना भेटले पाहिजे. हायकमांडच्या मनात आले तर सारे जमते. आंदोलनाची गरजही पडत नाही.
जिथे हायकमांडसमोर नेते विदर्भाबाबत 'ब्र' काढायला देखील घाबरतात, तेथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. विलास मुत्तेमवार - लेटर पॅडवर, 'एकच ध्यास - विदर्भ विकास','आता नागपूर झाले जागतिक व्यापाराचे केंद्र', 'जय विदर्भ' असा उल्लेख करतात व लोकसभेत नागपूर देशाची पर्यायी राजधानी म्हणून विकसित करण्याची मागणी करतात. म्हणून विलास मुत्तेमवारांचा आम्हाला अभिमान आहे. सर्वपक्षीय समितीचे नेतृत्व विलास मुत्तेमवार यांनी करावे. तसेच राष्ट्रीय काँग्रेसने २0१४ ची निवडणूक लक्षात घेत, नागपूर राजधानीसह वेगळे विदर्भ राज्य व मुख्यमंत्री म्हणून विलास मुत्तेमवार यांच्या नावाची घोषणा करावी. उर्वरित महाराष्ट्रांत सत्तांतर होईल, हे भय सोडून द्यावे. उपमुख्यमंत्र्यांच्या कारनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर आहे. तसेच पुढील निवडणूक काँग्रेसला सोबत घेऊनच लढायची आहे, अशी स्पष्ट घोषणा शरद पवार यांनी केली आहे.
दुसरा मार्ग कठीण असून, २0१४ च्या निवडणुकीचा आहे. उत्तरांचल, झारखंड, छत्तीसगड ही राज्ये कुणीही मागितली नव्हती. वाजपेयींच्या आशीर्वादाने ती राज्ये अस्तित्वात आली. नवीन राज्य निर्मिती ही गरज प्रशासनाची की राजकीय पक्षाची, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. परंतु, न मागणार्‍याला पायघड्या आणि हिरावलेले राज्य व राजधानी परत मागणार्‍याची अवहेलना, ही चूक वाजपेयींकडून घडलेली आहे. सबब ही जबाबदारी भारतीय जनता पक्षाने स्वीकारावी. परंतु, त्याकरिता केंद्रीय सत्ता हवी.
संयुक्त महाराष्ट्राकरिता १0५ नव्हे तर १0६ शहीद झालेत व १0६ वा शहीद विदर्भ होता! तसेच महाराष्ट्रवाद्यांनो, विदर्भातून चालते व्हा? असे तोंडावर सांगायला देखील हिंमत लागते. देवेन्द्र फडणवीस यांचाही आम्हाला अभिमान आहे. भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करावी आणि २0१४ ची निवडणूक सर्वांनी त्यांच्या नेतृत्वात लढवावी.
आपले उपद्रवमूल्य सिद्ध करा. दुबळय़ांच्या अहिंसेला काहीच किंमत नसते. आपले सर्मथक व सत्याग्रहींची संख्या इतकी वाढवा की, प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी भेटायला येईल. कुणाला सर्मथन तर कुणाला गद्दार घोषित करावेच लागेल.
विविध राजकीय पक्षांची झूल बाजूला ठेवत नेते व कार्यकर्त्यांनी 'वेगळे विदर्भ राज्य' हे एकच ध्येय समोर ठेवले पाहिजे. आगामी २0१४ च्या निवडणुकीसंबंधी व्यूहरचना व तयारी आजपासूनच करावी.
प्रत्येक महिन्याचा पहिला व तिसरा शनिवार, सकाळी ९ ते १0, फक्त एक तास, संपूर्ण विदर्भ बंद म्हणजे १00 टक्के बंद, झालाच पाहिजे. लहान-मोठी सर्व दुकाने, पानठेले, चहा टपरी, पाणीपुरी-भेलपुरी, फुलवाले, भाजीवाले, टेलर, न्हावी, मोची, रिक्षा, ऑटोरिक्षा, पेट्रोल पंप, हॉटेल सर्व बंद ठेवावे.फक्त दवाखाने व मेडिकल स्टोअर्स तसेच बसेस किंवा रेल्वे रोखू नयेत. सर्व दुकानदार व नागरिकांनी जवळच्या चौकात पोस्टरसह उभे राहावे. ज्येष्ठ नागरिक ांनी आपल्या घराजवळच परंतु ५-१0 च्या गटाने उभे राहावे. विद्यार्थ्यांनी शाळेसमोर उभे राहावे व तरुण मुलांनी चार चौकापुरती र्मयादित मोटारसायकल रॅली काढली पाहिजे. या एक तासात दुसरे कोणतेच व्यवहार होणार नाहीत. हा कार्यक्रम १00 टक्के पार पडला पाहिजे.
हुकूमशाहीतील क्रांतीची जागा लोकशाहीत परिवर्तनाने व रक्ताची जागा घामाने घेतली आहे.
'तुम्ही मला घाम द्या - मी तुम्हाला विदर्भ राज्य देतो,
तुमचा फक्त एक तासाचा घाम
हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवू शकतो,
लाखो मुले व महिलांची दुर्दशा टाळू शकतो,
तीन कोटी विदर्भवासीयांचे भाग्य उजळू शकतो,
लक्षात ठेवा - २0१४ ची निवडणूक वेगळय़ा विदर्भाकरिता आरपारचीच आहे!

No comments: