Thursday, June 13, 2013

पैनगंगा कमळवेल्ली घाटातून अवैध रेतीचा उपसा, माफियांविरुद्ध गुन्हा-लोकसत्ता





पैनगंगा कमळवेल्ली घाटातून अवैध रेतीचा उपसा, 

माफियांविरुद्ध गुन्हा-लोकसत्ता 

Published: Thursday, June 13, 2013



यवतमाळ जिल्ह्य़ातील पैनगंगा कमळवेल्ली घाटातून मोठय़ा प्रमाणात अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या माफियांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  झरी तालुक्यातील कमळवेल्ली घाटातून पोकलँड मशिनद्वारे रेतीचा उपसा होत असल्याची माहिती मिळल्यानंतर नगरसेवक अंकित नैताम यांनी रेती घाटावर जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी रेती काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे सूचना दिली. झरी तालुक्याचे मंडळ अधिकारी बोनगीरवार, नायब तहसीलदार निमसरकर घटनास्थळावर पोहोचल्यानंतर रेती माफिया शालीग्राम बोरेले, माधव माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाद घातला. 
अंकित नैताम व कार्यकर्ते मुरली वाघाडे, अशोत येमकंटीवार, राम मुत्तलवार, विनायक बोबडे यांच्यावरही रेती माफियांनी हल्ला केला. या प्रकरणाची माहिती नैताम यांनी पाटल पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी रेती माफियांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संपूर्ण झरी तालुक्यात निर्धारित प्रमापेक्षा हजारो ब्रास रेतीचा उपसा केला जात आहे. या प्रकाराकडे महसूल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेतीघाट कंत्राटदारांना जागा आखून देण्यात आली असून त्या जागेसह संपूर्ण नदीपात्रात १० ते २० फूट खोलीचे खड्डे करून मशिनद्वारे हजारो ब्रास रेतीचा साठा व विक्री कंत्राटदार करीत  आहेत. अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नैताम यांनी केली आहे. 
झरी तालुक्यातील घाटातील रेतीचा उपसा करून आंध्रप्रदेशात पाठविण्यात येत असून लगतच्या पिंपळखुटी येथे साठा करून ठेवला आहे. रेतीघाट कंत्राटदारांनी दोन कोटी रुपयांचा महसूल बुडविला असून संपूर्ण नदीघाटाचा पंचनामा व मोजमाप करून त्यांच्याकडून दंडाची वसुली करावी व फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या रॉयल्टी पावतीबुकचा वापर कमी प्रमाणात करण्यात येत आहे. शासनाचा महसूल बुडविण्यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप नैताम यांनी केला.

No comments: