Monday, January 9, 2012

सत्ताधारी आघाडीच्या विरोधात प्रचार करणार-किशोर तिवारी

सत्ताधारी आघाडीच्या विरोधात प्रचार करणार - किशोर तिवारी

http://epaper.lokshahivarta.in/epapermain.aspx?queryed=9&eddate=

राजकुमार भीतकर/ ९जानेवारी

यवतमाळ : शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार्‍या व राज्य आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या आघाडी सरकारच्या विरोधात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रचार करून आघाडीतील घटक पक्षांना त्यांची जागा दाखविणार असल्याची, माहिती शेतकरी नेते व विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दै. 'लोकशाही

वार्ता'ला दिली. तिवारींच्या या भूमिकेमुळे आघाडीतील घटक पक्षांना मोठा फटका बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या मुलाखतीत तिवारी पुढे म्हणाले, आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शेतमाल हमी भाव, महागाईसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर जनतेची घोर निराशा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या मुद्यांवर जनजागृती करून आघाडीच्या उमेदवाराला नामोहरम करण्याचा आमचा संकल्प आहे. एकीकडे राज्य आणि केंद्रात आघाडीत असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी जिल्हय़ात स्वबळावर लढणार आहेत. आघाडीतील या घटक पक्षांजवळ जनतेसमोर जाण्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. सरकारने शेतकरी आणि सामान्य जनतेचा विश्‍वासघात केला आहे. कापूस प्रश्नांवर आघाडी सरकारने विदर्भातील शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारच्या कापूस निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कवडीमोल किमतीत कापूस विकावा लागला. यावर्षी आगष्ट महिन्यापासून सत्तारूढ पक्षानेच कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये हमी भाव देण्यात यावा, अशी ओरड केली. कंगाल व कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यात हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे. आघाडी सरकरच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा खुला विरोध या निवडणुकीत आम्ही करणार आहोत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाला घेरत पाच राज्यात काँग्रेसविरोधी भूमिका घेण्याचे ठरविल्यानंतर विदर्भ जनआंदोलन समितीने घेतलेली भूमिका काँग्रेस व राष्ट्रवादीला विदर्भात हादरा देणारी ठरण्याची शक्यता आहे. आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शेतकर्‍यांनी सक्षम विरोधी पक्षाला मतदान करावे, असे आवाहनही किशोर तिवारी यांनी केले आहे. शेतकरी आत्महत्या, शेतमालाच्या हमी भावाचा प्रश्न, कापूस, धान व सोयाबीन उत्पादकांना मिळालेली तुटपूंजी मदत, उद्द्धवस्त झालेले शेतकर्‍यांचे संसार, वाढती महागाई आणि सरकारचा दांभिकपणा आदी मुद्यांवर मतदारांच्या दारापर्यंत जाऊन जनजागृती करणार असल्याचा निर्णय 'विजस'ने घेतला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण व महिला व बालविकास, ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण भागातील आर्थिक व सर्व क्षेत्रातील विकासासाठी येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी राजरोजसपणे लुटला जात असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला.
विदर्भ जनआंदोलन समिती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात आपले उमेदवार उभे करणार आहे. 'कौन बनेगा करोडपती' या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या अपर्णा मालीकर, समितीचे सचिव मोहन जाधव, प्रेम चव्हाण, आदिवासी नेते बाबुलाल मेर्शाम यांना समितीतर्फे उमेदवारी दिली जाणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले. सक्षम असलेल्या भाजप, शिवसेना किंवा अपक्ष उमेदवारालाही पाठिंबा देण्याचा निर्णय विदर्भ जनआंदोलन समितीने घेतल्याचेही तिवारींनी स्पष्ट केले

No comments: