Wednesday, February 29, 2012

बीटी कॉटनचे परिणाम तपासणार - संसदीय समिती आज विदर्भात-lokmat

बीटी कॉटनचे परिणाम तपासणार - संसदीय समिती आज विदर्भात-lokmat


बीटी कॉटनचे परिणाम तपासणार - संसदीय समिती आज विदर्भात-lokmat
नागपूर। दि. २९ (प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या स्थितीची तसेच बीटी कॉटनच्या बियाणांमुळे खरेच शेतकर्‍यांना फायदा झाला का? याची पाहणी करण्यासाठी ज्येष्ठ खासदार वासुदेव आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती उद्या, नागपुरात येत आहे.
देशात जेनेटिकली मॉडीफाईड बियाणांची लागवड मोठय़ा प्रमाणावर होत आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. विदर्भातही गेल्या काही वर्षापासून बीटी कॉटनची लागवड सुरू आहे. या वाणाचा खरेच देशातील शेतकर्‍यांना फायदा होत आहे काय? देशात या वाणांची वस्तुस्थिती नेमकी काय आहे? याची पाहणी करण्यासाठी ही समिती येत आहे. बीटी कॉटनच्या लागवडीला सरकारने २00४-0५ मध्ये परवानगी दिली होती. विदर्भासारख्या कोरडवाहू शेतीमध्ये बीटी कॉटनमुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु काही कंपन्या काही जणांना हाताशी धरून बीटी वाणांमुळे शेतकर्‍यांना बराच फायदा होत असल्याचा दावा करीत आहे. या दाव्यात खरेच तथ्य आहे काय? याची पाहणी करण्याचे काम ही समिती करणार आहे. सध्या ही समिती मध्य प्रदेशच्या दौर्‍यावर आहे. उद्या रात्री नागपुरात येत आहे. शुक्रवारी सकाळी ही समिती यवतमाळ येथे जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. बीटी कॉटन बियाणांचे उपयोगही या जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात होत असल्याने या जिल्ह्याची पाहणी ही समिती करणार आहे. याच जिल्ह्यात आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्याही अधिक आहे. ही समिती तेथे शेतकर्‍यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर अधिकार्‍यांशी चर्चा करतील.
केंद्र सरकार जैवतंत्रज्ञान नियामक प्राधिकरण (बीआरएआय) कायदा करणार आहे. याबाबत शेतकर्‍यांचे मत जाणून घेण्याचा या समितीचा मानस आहे.
विदर्भातील कोरडवाहू शेतकर्‍यांना बीटी बियाणांमुळे जवळपास १0 हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या या प्रस्तावित कायद्याचा विरोध करावा, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे. या संसदीय समितीमध्ये विदर्भातील कुणी सदस्य आहे किंवा नाही, याची माहिती नसल्याचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. जे.सी. भुतडा यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर ही समिती विदर्भातील अधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे डॉ. भुतडा यांनी सांगितले.
=================
===========

No comments: