Thursday, May 3, 2012

पांढरकवड्यात ४ मेंला तेंदूपत्ता मजूर मेळावा बोनस वाटप-रोहयो कामाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आदिवासींचा एल्गार

पांढरकवड्यात ४ मेंला तेंदूपत्ता मजूर मेळावा
बोनस वाटप-रोहयो कामाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आदिवासींचा एल्गार

जमिनीच्या अधिकाराचा प्रश्न प्रलंबित
आदिवासींना जल - जंगल - जमीन हा घटनात्मक अधिकार मिळावा, यासाठी विदर्भ जनआंदोलन समितीने १९९९ मध्ये तेंदुपत्ता मजूर समिती स्थापन करून सतत ५ वर्षं लढा दिला व तेंदुपत्त्याचा बोनस आदिवासींना मिळवून दिला. मात्र आदिवासींच्या जमिनीच्या अधिकाराचा प्रश्न प्रलंबित असून यासाठी नव्याने लढा सुरू करण्यात येत आहे. वनखात्यामार्फत मूळ निवासी कोलाम व इतर आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचा कट रचला जात असून आदिवासींमध्ये लोकजागृती व पुढील आंदोलनाची दिशा या तेंदुपत्ता मजूर मेळाव्यात ठरविण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी नेते लेतुजी जुनगरे व तुकाराम मेश्राम यांनी दिली.
Pandharkawada 3 may 2012 
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वनखात्याच्या कामामध्ये अफलातून भ्रष्टाचार होत असून हयात असणारया - नसणारया तेंदुपत्ता मजुरांचे रोजगार हमीचे कार्ड कंत्राटदारांनी जमा    करून कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. या सुनियोजित भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्राच्या सनदी अधिकारयांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे हे संपूर्ण प्रकरण तेंदुपत्ता बोनस वाटप, रोजगार हमी योजनेच्या कामातील प्रचंड भष्ट्राचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी विदर्भ जनआंदोलन समिती व तेंदुपत्ता मजूर समितीने ४ मे रोजी पांढरकवडा येथील अग्रसेन भवनमध्ये तेंदुपत्ता मजूर मेळावा आयोजित केला आहे.
तेंदुपत्ता मजूर समितीने १९९९ ते २००५ पर्यंत सतत आंदोलन करून तेंदुपत्याच्या मालकीचा घटनात्मक अधिकार मिळवून घेतला व लिलावाद्वारे प्राप्त होणारी रक्कम तेंदुपत्ता मजुरांमध्ये बोनस म्हणून वाटप करण्यास सरकारने २००६ पासून सुरुवात केली. मात्र मजुरांना तेंदुपत्ता तोडाईचा हिशोब ठेवण्यासाठी कार्ड न देणे, खोटे तेंदुपत्त्याचे हिशोब तयार करून वनअधिकारी व तेंदुपत्त्याचे खळेदार मागील ४ वर्षांपासून ७० टक्के तेंदुपत्ता मजुरांना तेंदुपत्त्याच्या बोनसपासून वंचित ठेवत आहे सीबीआयला चौकशीसाठी द्यावे, या दोन मागण्या सरकार दरबारी रेटण्यासाठी तेंदुपत्ता मजूर समितीने येत्या ४ मे ला पांढरकवडा येथील अग्रसेन भवनमध्ये तेंदुपत्ता मजूर मेळावा आयोजित केला असल्याची माहिती तेंदुपत्ता मजूर समितीचे संयोजक व विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.
या कार्यक्रमाला श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांना आमंत्रित करण्यात आले असून आदिवासी नेते तुकाराम मेश्राम, लेतुजी नुजगरे, भीमराव नैताम, अंकीत नैताम, शेतकरी नेते मोहन जाधव, मोरेश्वर वातीले, सुरेश बोलेनवार, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, सुनील राउत हे या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात प्रमुखपणे तेंदुपत्ता बोनस वाटपातील मागील ४ वर्षांमधील सर्व तक्रारींवर चर्चा होणार असून महाराष्ट्र रोजगार हमीच्या वनविभागातील कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची जनसुनावणी होणार आहे. तसेच तेंदुपत्ता मजूर समितीतर्फे संपूर्ण दारूबंदी व महिला बचत गटाच्या कर्जमाफीसाठी यावेळी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ठराव पास करण्यात येतील, अशी माहिती तेंदुपत्ता मजूर समितीचे नेते नैताम यांनी दिली.

No comments: