Sunday, June 3, 2012

‘बिगबॉल’चे बोगस बीटी बियाणे दाखल-lokmat


‘बिगबॉल’चे बोगस बीटी बियाणे दाखल- lokmat     
खरीप हंगामातील बाराशे कोटींचा महसूल मिळविण्यासाठी नामांकित कंपन्यामध्ये चढाओढ सुरू आहे. याच सुमारास बोगस बियाणे कंपन्यांनी जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. या कंपन्या गावपातळीवर शेतकर्‍यांना स्वस्त दरामध्ये बियाणे विकत आहेत. यातून शेतकर्‍यांना लाखोंचा गंडा बसला आहे.
कपाशीचा हंगाम कॅश करण्यासाठी राज्यात ११९ कंपन्या दाखल झाल्या आहेत. या कंपन्या राज्यातील शेतकर्‍यांना दोन कोटी पॅकेट्स पुरविणार आहेत. यातील एक कोटी १४ लाख पॅकेट्स बाजारात आले आहेत. याच सुमारास बोगस बीटी बियाण्यांनी बाजारात धुमाकुळ घातला आहे. महागाव तालुक्यात ‘बिगबॉल’ नावाने बोगस बीटी बियाणे बाजारात आणले आहे. ही कंपनी गावामध्ये जावून शेतकर्‍यांना बियाणे विकत आहे. याचे कुठलेही बियाणे कृषी सेवा केंद्रामध्ये विक्रीला नाही. बीटी बियाण्याचा अधिकृत दर ८३0 ते ९३0 रुपये आहे. त्या तुलनेत या बियाण्याची विक्री ६00 रुपये दराने केली जात आहे. या बॅगवर उत्पादन ठिकाण, बियाण्याचा दर, त्याचे वजन, बियाणे पॅक करण्याची तारीख आदी बाबींचा उल्लेख नाही. ही कंपनी शेतकर्‍यांना कुठलेही बिल देत नाही. गावातील निरक्षर शेतकरी पाहून ही कंपनी शेतकर्‍यांना फसविण्याचे काम करीत आहे. या कंपंनीने गाव, वस्त्या, पोडांवर अनेक पेट्या विकल्या आहे. यातून शेतकर्‍यांची लाखोंची लुट होत आहे.
पॅकेटमध्ये सरकी
बोगस बियाणे कंपनी बाजारातून सरकी विकत घेवून त्यावर प्रक्रिया करीत आहे. यामुळे हे बियाणे उगवणार किंवा नाही, हा प्रश्न आहे. अशा बोगस कंपन्यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होवू नये म्हणून भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. मात्र या कंपन्या भरारी पथकालाही चकमा देत आहे.
बियाण्यांची चढय़ा दराने विक्र ी
अनेक जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत मोजक्याच वाणाला मागणी आहे. यातून विक्रेत्यांनी ८३0 रुपयांचे बियाणे दीड हजार रुपयात विकण्यास प्रारंभ केला आहे. बियाण्यांच्या या चढय़ा दरामुळे शेतकर्‍यांची लुट होत आहे.
या संदर्भात कृषी आयुक्त उमाकांत दांगट (पुणे) यांच्याशी संपर्क केला असता अशा कुठल्याही कंपनीला परवाना दिला नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही कंपनी बोगस आहे. शेतकर्‍यांनी अशा स्वरूपाचे बियाणे घेवू नये, त्यांना सरळ कृषी विभागातील भरारी पथकाच्या स्वाधिन करावे, असेही दांगट यांनी स्पष्ट केले.

No comments: