Saturday, August 8, 2015

शेतकर्‍यांसाठी कलावंतांकडून 'मदतीचे पुढचे पाऊल'-अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे येणार


शेतकर्‍यांसाठी कलावंतांकडून 'मदतीचे पुढचे पाऊल'-अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे येणार


भारताने उद्योग आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती केली असली तरी भारताची खरी ओळख कृषीप्रधान देश अशीच आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा देशभर गाजत आहे. देशात गरीब आणि श्रीमंतांमधील दरी दिवसेंदिवस रुंदावतच चालली आहे. शेतक-यांच्या आत्महत्या या समस्येवर सद्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. परंतु, शेतकरी कुटुंबांच्या दैन्यावस्थेत तसुभरही फरक पडलेला नाही. लाखांचा पोशिंदा  असलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी अता नाट्य व चित्रपट कलावंतांनी पुढचे पाऊल टाकले आहे. 
याचाच एक भाग म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मदतीचा हा कार्यक्रम सोमवार १० ऑगस्ट रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी ९.३० वाजता होणार आहे. शेतकरी आत्महत्या आणि त्यावर प्रसिद्धी माध्यमांमध्ये होणारे उदंड भाष्य याला बळीराजा कंटाळला आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर 'शेतकरी मरतोय तर मरू द्या, पण त्याच्या आत्महत्येची कारणेमिमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा'. अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्या शिवाय राहत नाही. त्यामुळे या कलावंतांनी उक्तीहून कृती श्रेष्ठ या न्यायाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबियांना मदत करण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, ही मदत एका कार्यक्रमातून दिली जाणार आहे. कलावंतांकडून होऊ घातलेला मदतीचा श्रीगणेशा ही केवळ सुरुवात असून समाजासाठी यापुढेही ही संवेदना कायम ठेवण्याचा मानस आहे. सामाजिक बांधिलकी जपून कलावंत पुढे आल्याने सामाजिक संघटना 'जनमंच'ने या कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले आहे. अध्यक्षस्थानी सामाजिक कळवळय़ाचे प्रेरक नाना पाटेकर राहणार आहेत. मदतनिधी उभा करण्यासाठी धडपडणारे मकरंद अनासपुरे, लेखक श्याम पेठकर, नाट्य दिग्दर्शक हरिश इथापे, शेतकरी नेते किशोर तिवारी आदी उपस्थित राहणार आहेत. मान्यवर, संवेदनशील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जनमंचने केले आहे

No comments: