Saturday, April 30, 2016

मागेल त्याला पीक कर्ज- 80 टक्के शेतक-यांना 31 मेपूर्वी कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा- किशोर तिवारी


 मागेल त्याला पीक कर्ज- 80 टक्के शेतक-यांना 31 मेपूर्वी कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा-  किशोर तिवारी

Ø 80 टक्के शेतक-यांना 31 मेपूर्वी कर्ज वाटप प्रक्रिया पूर्ण करा

Ø मागेल त्याला पीक कर्ज, तालुकास्तरावर कर्ज मेळावे

Ø शेतक-यांना सातबारा व आठ अ घरपोच मिळणार

Ø कर्जाचे पुनर्गठन करून सर्व शेतक-यांना पीककर्ज द्या
# शेतक-यांना पीककर्जासाठी अकराशे कोटी रूपये वाटपाचे ध्येय ठरवा   

             वर्धा, दिनांक 30 – अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप हंगामासाठी सर्व बँकांनी 80 टक्के शेतक-यांना 31 मेपूर्वी कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, यासाठी तहसील कार्यालयातर्फे शेतक-यांच्या याद्या, तसेच सातबारा व आठ अ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, शेतक-यांना अकराशे कोटी रुपये पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा सर्व बँकांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.

           विकास भवन येथे राष्ट्रीयकृत व खासगी बँकेच्या 138 बँक व्यवस्थापक, तालुकास्तरावरील महसूल, कृषी, सहकार आदी अधिका-यांची खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपासंदर्भात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना किशोर तिवारी बोलत होते. यावेळी आमदार कुणावार, प्र.जिल्हाधिकारी दीपक नलवडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रशांत इंगळे तिगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, नाबार्डच्या श्रीमती स्नेहल बन्सोड यावेळी उपस्थित होत्या.

शेतक-यांना खरीप हंगामासाठी मागील वर्षी केवळ 40 टक्के शेतक-यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु यावर्षी 80 टक्के शेतक-यांना खरीपासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे, अशी सूचना करताना किशोर तिवारी म्हणाले, की शासनाने पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय्‍ घेतला असल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी 31 मेपूर्वी प्रत्येक शेतक-याला कर्ज पुरवठा होईल, यादृष्टीने सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

                वर्धा जिल्ह्यासाठी 700 कोटी रुपये कर्जाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे,परंतु 1 लाख 96 हजार शेतक-यांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे असेल तर 1100 कोटी रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे. यासाठी तहसीलदारांकडून गावनिहाय शेतक-यांची यादी तसेच त्यासोबत सातबारा व आठ अ हा नमुना बँकांना उपलब्ध करून द्यावा, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.

                शेतक-यांना कर्जपुरवठ्यासाठी तालुकानिहाय कर्ज मेळावा घेण्याची सूचना करताना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तलाठी व कृषी सहायक यांनी तालुकानिहाय यादी करून शेतक-यांना आवश्यक असलेले कागदपत्रे तयार करून बँकांना उपलब्ध करून द्यावेत. कर्ज मिळण्यासाठी विलंब होणार नाही, यादृष्टीने महसूल यंत्रणा व बँकेच्या शाखा प्रमुखांमध्ये समन्वय ठेवावा, कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक, सिलिंगमध्ये मिळालेले जमीनधारक तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांना प्राधान्य द्यावे असेही यावेळी किशोर तिवारी यांनी सांगितले.

             शेतक-यांना पीक कर्जाचे पुनर्गठन झाल्यानंतर पूर्ण कर्ज मिळेल, याची हमी घेण्याची सूचना आमदार समीर कुणावार यांनी केली. तसेच बँकांनी मागेल त्याला पीककर्ज यानुसार जास्तीत जास्त शेतकरी खातेदारांपर्यंत पोहचवून कर्ज पुरवठा करावा. शेतक-यांना 1 लाखापेक्षा जास्त कर्ज घेताना कर्जासाठी मॉडगेज करावे लागते, त्यासाठी येणारा खर्च शेतक-यांना भूर्दंड असल्यामुळे ही मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवावी,यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना भेटून शेतक-यांसाठी सुलभ धोरण ठेवण्याचा आग्रह करण्यात येणार असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले.

             प्र.जिल्हाधिकारी श्री.नलवडे यांनी 80 टक्के शेतक-यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, यासाठी तालुकास्तरावर 7 मेपासून कर्ज मेळावे घेण्यात येणार आहेत, 1 मे रोजी होणा-या ग्रामसभेमध्ये पीककर्जाचे पुनर्गठन व दुष्काळी परिस्थितीत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती ग्रामस्थ व शेतक-यांना द्यावी, अशी सूचना केली. लीड बँकेचे मॅनेजन विजय जांगडा यांनी शेतक-यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सर्व बँकांनी पूर्वनियोजन केले असून 80 टक्के शेतक-यांना कर्जपुरवठा करण्याची तयारी आहे. आतापर्यंत 17 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

             पीक कर्जाचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कर्ज न घेतलेल्या शेतक-यांच्या तालुकानिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याला 700 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असले तरी शेतक-यांना पीक कर्जासाठी पुनर्गठन झाल्यानंतर कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात 53 हजार 837 शेतकरी खरीप पीककर्जाचे पुनर्गठन करण्यास पात्र शेतकरी असून 47 लाख 437 रुपयांचे पुनर्गठन होणार आहे.

              प्रारंभी प्र. जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी स्वागत केले. तर निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामासंदर्भातील पीककर्जाबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

No comments: