Thursday, October 13, 2016

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना देणार अनुदान तत्वावर बियाणे-निर्णय | स्व. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचेे किशोर तिवारी यांची माहिती

 
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना देणार अनुदान तत्वावर बियाणे-निर्णय | स्व. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचेे किशोर तिवारी यांची माहिती 
 
Published on 14 Oct-2016
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना देणार अनुदान तत्वावर बियाणे --शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ ---अडचणीतील शेतकऱ्यांना देणार आता मदतीचा हात 
प्रतिनिधी | 

खरीपहंगामात पिकांना लागणाऱ्या पावसापेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट येणार आहे. तसेच दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. मात्र, जिल्ह्यात जलयुक्तच्या कामामुळे आणि पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी रब्बीचे पीक घेण्यास उत्सुक आहे. रब्बीच्या हंगामात हरभरा पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी अनुदान तत्त्वावर बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिली. 
या वेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ दीपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड आदी उपस्थित होते. किशोर तिवारी म्हणाले, जिल्ह्यात झालेल्या अधिक पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक वाया गेले आहे. तसेच आलेल्या उत्पादनाला बाजारात भाव मिळणे कठीण असल्यामुळे या शेतकऱ्यांना आता रब्बी पिकाकडे वळवावे लागणार आहे. जलयुक्त शिवारच्या कामामुळे पाण्याचा साठा चांगल्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे येत्या काळात रब्बीसाठी शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गेल्या काही काळात रब्बी पिकाखालील क्षेत्र सातत्याने वाढत आहे. या वर्षी किमान सव्वातीन लाख हेक्टरवर रब्बीच्या पिकाचे नियोजन राहणार आहे. यासाठी लागणारे सुमारे ५० हजार क्विंटल बियाणे उपलब्धतेसाठी नियोजन करावे. रब्बी पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होण्याची शक्यता कमी असल्यामुळे यातून शेतकऱ्यांना चांगला आधार मिळणार आहे. खरीप हंगामातील पिकाला चांगला भाव मिळण्यासाठी शासनाच्या खरेदी संस्थांनी किमान आधारभूत किंमतीने शेतमालाची खरेदी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 
शेतकऱ्यांनी केवळ शेत पिकावर अवलंबून राहू नये, त्यांनी त्यावर प्रक्रिया उद्योग उभारावे, यासाठी मुद्रा योजनेतून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून ही योजना ग्रामकेंद्रीत करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रत्येक गावात किमान १० नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा घेणे गरजेचे आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
रब्बी हंगाम पूर्व आढावा बैठकीत बोलताना किशोर तिवारी इतर अधिकारी. 
३ लाख २० हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचा अंदाज 
जिल्ह्यात खरीप हंगाम साधारणत: नऊ लाख हेक्टरवर घेतल्या जातो. त्या तुलनेत रब्बी हंगाम चकीत करणाराच आहे. केवळ ९० हजार हेक्टरवर रब्बी हंगाम घेतल्या जात असल्याची आकडेवारी कृषी विभागच सांगते. अशा परिस्थितीत रब्बी हंगाम लागवडीचे क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे. यासाठी सिंचनाची पुरेपुर व्यवस्था असावी लागते. यंदा पावसाची सरासरी दरवर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम लागवडीचे क्षेत्र वाढवण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. 
शासकीय योजनांचा फायदा होणे गरजेचे 
गावाच्या विकासासाठी चांगली शाळा, आरोग्य व्यवस्था, विजेचा पुरवठा यासोबतच शासनाने दिलेल्या अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. अशा परिस्थितीत तळागाळातील सर्वांना या योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. या व्यवस्था चांगल्या मिळाल्यास शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या जीवनमानावर चांगला परिणाम होऊ शकतो. त्यातही आत्महत्येचा आकडाही कमी होण्यास मदत मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्याची गरज आहे. 
नुकसान झाल्यास विम्याचा लाभ देणार 
गेल्या काही दिवसातील पावसामुळे सोयाबिनचे पीक तोटयात येणार आहे. या वर्षी पीक विम्याला चांगला प्रतिसाद मिळालेला असल्यामुळे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. विमा कंपनी नुकसानीची पाहणी करण्यास वेळ लावत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर नायब तहसीलदारांमार्फत पंचनामा करण्यात येईल. हा पंचनामा विमा कंपनीला पाठवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात येईल. नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येईल. 
===============================================

 

No comments: