Saturday, December 4, 2010

गडकरींच्या ‘गावजेवणा’चा गावभर गाजावाजा..लोकसत्ता

गडकरींच्या ‘गावजेवणा’चा गावभर गाजावाजा..लोकसत्ता Print
सलग तिसऱ्या दिवशीही विवाहाचीच चर्चा
विक्रम हरकरे
नागपूर, ४ डिसेंबर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पुत्राच्या शाही विवाहाची चर्चा रेशीमबाग मैदानावर गडकरी कुटुंबाने आज दिलेल्या ‘लक्ष’भोजनामुळे सलग तिसऱ्या दिवशीही चांगलीच रंगली. ज्या रेशीमबाग मैदानावर गडकरींनी रा.स्व. संघाच्या शिबिरांमध्ये स्वयंसेवक म्हणून प्रशिक्षण घेतले त्याच मैदानावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पुत्राच्या विवाहाची जंगी मेजवानी दिली. काही वर्षांपूर्वी शंकर मोहिते पाटलांकडे लातूरकरांना दिलेले ‘लक्ष’भोजन महाराष्ट्रात चर्चेचे ठरले होते. आता गडकरींकडच्या ‘लक्ष’भोजनाची यात भर पडली आहे. आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येऊन नवदामपत्याला आशीर्वाद दिले.
आज दुपारी २ वाजेपासूनच रेशीमबाग परिसरात लोकांची गर्दी दिसू लागली. रा.स्व. संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील मुख्य रस्ता दुपारी १२ नंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पोलिसांची चौकाचौकात आणि मंडप परिसरात डय़ुटी लागली. पोलिसांची वाहने, गाडय़ांचे ताफे, खाजगी सिक्युरिटी गार्ड, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक सारे सारे पहाटेपासून कामाला भिडले होते. भाऊंच्या घरच्या लग्नात राबताना प्रत्येकाला वेगळा आनंद होता. अख्ख्या विदर्भातून येणाऱ्या पै-पाहुण्यांच्या स्वागतात कुठलीही कमतरता राहू नये, कुणाचाही अपमान होऊ नये, अशा खुद्द भाऊंच्या सूचना होत्या. त्यामुळे प्रत्येकजण हक्काने भाऊंच्या घरी जेऊन गेला. अख्खे नागपूर लोटल्याचा भास व्हावा, एवढे लोक ‘लक्ष’भोजनाला आले आणि नवदांपत्याला आशीर्वाद देऊन गेले.
एरवी रेशीमबाग मैदानावर दिसणारी खेळाडूंची चहलपहल गेल्या दहा दिवसांपासून जणू हरवली होती. संपूर्ण रेशीमबाग मैदानाभोवती किल्ल्याच्या तटबंदीसारखी रचना करण्यात आली. दीड लाख लोकांची गर्दी सामावून जाईल, एवढा भव्य शामियाना उभारण्याचे काम दहा-बारा दिवसांपासून सुरू होते. जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कनाती, कमानीच्या आकाराचे फुलांनी सजवलेले मुख्य प्रवेशद्वार, पाच बाजूंनी पाच प्रवेशद्वार, टांगलेली झुंबरे, दिव्यांची आरास, मध्यभागी उभारलेला भव्य स्टेज, पाच भोजन कक्षांमधील कॅटरिंग आणि अतिशय साधा पण रुचकर मेनू, अशी योजनाबद्ध आखणी ‘लक्ष’भोजनासाठी करण्यात आली होती. प्रत्येक भोजनकक्ष किमान २०-२५ हजार लोक मावतील एवढा भव्य होता.
जामठय़ातील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या पंचतारांकित परिसरात गडकरींनी शुक्रवारी दिलेल्या व्हीव्हीआयपी मेजवानीनंतर त्यांनी घराघरात ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी ‘लक्ष’भोजन दिले. रेशीमबागेतील रिसेप्शनसाठी वेगळ्या पत्रिका छापण्यात आल्या होत्या. प्रत्येक नगर प्रमुखाच्या मार्फत सर्वाना पत्रिका मिळतील, याची पूर्ण व्यवस्था गडकरी कुटुंबाने केली होती. रेशीमबागेत अख्ख्या विदर्भातून लोटलेल्या जनसागरावरून त्याची प्रचिती आली. शुक्रवारी ४० विमानांची घरघर नागपूरने अनुभवली तर, शहराच्या मध्यभागी असलेला रेशीमबाग परिसर आज लाखो लोक आणि हजारो गाडय़ांनी गजबजून गेला होता. क्रमांक पाचच्या भोजनकक्षाच्या प्रवेशद्वारातून बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी दुपारी प्रवेश खुला करण्यात आला. रात्री त्यांची परत जाताना गैरसोय होऊ नये, याची पूर्ण काळजी गडकरींनी घेतली. काल रात्रीपासूनच भाऊंकडील वऱ्हाडय़ांचे आगमन सुरू झाले होते. काही वऱ्हाडींनी तर मुलाबाळांसह तर चक्क शामियान्यातच दिवसभर मुक्काम ठोकला.
सायंकाळी ५ नंतर क्रमांक दोन आणि चार प्रवेशद्वारातून प्रवेश सुरू झाला. सात वाजेनंतर मुख्य प्रवेशद्वार खुले होताच गर्दी वाढली. रात्री आठनंतर तर पाय ठेवायला जागा नव्हती. त्यावेळी गडकरींचे खास पाहुणे एकापाठोपाठ एक उतरले. गेल्या तीन दिवसांपासून सतत वऱ्हाडय़ांची बडदास्त ठेवण्यात व्यस्त असलेल्या नितीन गडकरींच्या चेहेऱ्यावर कुठलाही थकवा जाणवत नव्हता. सुहास्य वदनाने प्रत्येकाचे स्वागत करण्यात ते तेवढय़ाच तन्मयतेने व्यस्त होते. रात्री बारा वाजेपर्यंत लोकांचे येणे सुरू होते पण, कुणालाही गडकरी कुटुंबाने जेवल्याशिवाय जाऊ दिले नाही.
कॅटरिंगचे कंत्राट मिळालेले कॅटर्स तीन दिवसांपासूनच शामियान्याच्या मागील भागात तीन मोठ्ठे मंडप उभारून तयार केलेल्या भटारखान्यात कामाला भिडले होते. गडकरींचे विश्वासू नगरसेवक बंडू राऊत यांच्याकडे भोजनाची सारी सूत्रे सोपण्यात आली होती. तेलाचे शेकडो पिपे, भाज्या, पनीर, मसाले, दह्य़ांचे पिपे, गॅसचे शेकडो सिलेंडर्स, हजारो डिशेस, बाऊल्स, चमचे, स्वयंपाकाची मोठ्ठाली भांडी ठेवता ठेवता साऱ्यांची पुरेवाट झाली. शेकडो आचारी, कामवाल्या बाया, हरकामे राबत होते. यानिमित्ताने त्यांनाही रोजगार मिळाला. पाचही भोजनकक्षात पुरी, रोटी, तंदुरी, बैगन मसाला, मटर पनीर, राईस, पकोडे, मठ्ठा, जिलेबी, बुंदी-गुलाबजाम आणि दाल, असा खास मेनू वऱ्हाडय़ांसाठी ठेवण्यात आला होता.
दुपारचे जेवण सुरू झाल्यानंतर नितीन गडकरी, कांचन गडकरी, नवरा मुलगा निखील आणि सून ऋतुजा यांच्यासह मुख्य स्टेजवर आले. नवदांपत्याला भेटून शुभेच्छा देण्यासाठी लहानथोरांनी एकच गर्दी केली. गडकरी जातीने प्रत्येकाला जेवून जाण्याचा आग्रह करत होते. मधल्या काही तासांसाठी गडकरींनी विश्रांती घेतली आणि सायंकाळी पुन्हा सहकुटुंब स्टेजवर आले. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरी भोजनाला येण्याचे प्रत्येकाला अप्रुप होते. गडकरींचा नागपूरच नव्हे तर, विदर्भातील घराघरात असलेला प्रचंड जनसंपर्क आणि दीड लाख लोकांना जेवण देण्यासाठी उभारलेली सूत्रबद्ध यंत्रणा पाहताना त्यांच्यात दडलेला कुशल संघटक आणि अस्सल कार्यकर्त्यांला अशा कार्यक्रमांचा असलेला दांडगा अनुभव याचाही प्रत्यय आला.
प्रत्येक प्रवेशद्वारावर पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी नगर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोपवण्यात आली होती. ध्वनिक्षेपकावरून वऱ्हाडींचे स्वागत केले जात होते. पार्किंगच्या आणि कोणत्या प्रवेशद्वारातून यायचे आहे, याच्या वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या. रेशीमबाग परिसरातील तब्बल २२ जागांवर पार्किंगची व्यवस्था होती. या ‘लक्ष’भोजनासाठी पाण्याचे ५० पेक्षा जास्त टँकर्स दिवसभर ये-जा करत होते. काही वर्षांपूर्वी बॉटनिकल गार्डनमध्ये भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांसाठी खास भोजन दिले होते. त्यांच्याकडील भोजनाचा ५० हजारापेक्षा अधिक वऱ्हाडींनी आस्वाद घेतला होता. त्याचीही आठवण यानिमित्ताने नागपूरकरांना झाली.
कधीकाळी संघाचा साधा स्वयंसेवक असलेल्या आणि आता एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष झालेल्या एका नागपूरकराने रा.स्व. संघाच्या परिसरात घातलेल्या ‘लक्ष’भोजनाची चव आणखी काही दिवस तरी नागपूरकरांच्या जिभेवर निश्चितपणे रेंगाळत राहणार आहे.
==============================
===============================================================

No comments: