Wednesday, December 15, 2010

सगळ्यांचेच आदर्श ‘टॉवर्स’ जे.जे. इस्पितळात डॉ.तात्यां लहाने

सच्चाई

मुंबईतील श्रीमंतही बेघर झाले; सगळ्यांचेच आदर्श ‘टॉवर्स’ जे.जे. इस्पितळात डॉ. लहाने यांची फोडणी! तात्यांचा फेरफटका!


http://www.saamana.com/2010/December/16/Mainpage1.htm


सर्वत्र भ्रष्टाचाराचे अराजक माजले आहे. सत्य- सचोटीचा दुष्काळ पडला आहे. सज्जन माणूस आता शोधूनही सापडणार नाही असे वातावरण असताना शनिवारी संध्याकाळी एक सज्जन माणूस स्वत:च्या पायाने चालत माझ्याकडे आला. डॉ. तात्याराव लहाने असे त्यांचे नाव. हिंदुस्थान सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन सन्मान केला. त्या ‘पद्मश्री’ंची सरकारी माळ जे. जे. इस्पितळाच्या नेत्र विभागात ठेवून डॉ. लहानेंची पायपीट सुरू आहे.
‘प्रभादेवीच्या गल्लीत काय करताय?’
‘समोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश परब यांनी एक कार्यक्रम ठेवला आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त. ग्रामविकासमंत्री पाटील येणार आहेत. त्यांना यायला उशीर होतोय. म्हणून ‘सामना’त वळलो. मंत्री आले तर ठीक, नाहीतर भाषण ठोकून निघून जाईन,’ तात्यांनी त्यांच्या मिश्किल शैलीत ठोकून दिले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जे. जे. इस्पितळाचे ते डीन झाले आहेत. तरीही रोज सकाळी ९ वाजता न चुकता ‘नेत्ररोग’ विभागात जातात व रुग्णांना तपासतात. शस्त्रक्रिया करतात. डॉ. लहाने यांचे मोठेपण असे की, गाव-खेड्यातून येणार्‍या प्रत्येकाला ते भेटतात व डोळ्यांवरील अंधाराचे पडदे दूर करतात. तात्याराव लहाने अंधश्रद्धेचे विरोधक, पण गाव-खेड्यातल्या रुग्णांची या डॉक्टरांवर अंधश्रद्धा. लहान्यांचा हात डोळ्यास लागला की दृष्टी परत येईल या श्रद्धेतून रोज असंख्य दृष्टिहीन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून जे. जे.त येतात. हे चित्र गेली अनेक वर्षे मी पाहतो आहे. ‘तात्या, डीन झालात. आता विद्यापीठाचे कुलगुरू कधी होणार?’ माझा प्रश्‍न.
‘अद्यापि रिटायरमेंटला वेळ आहे. नुसते कुलगुरूपद घेऊन काय मिरवायचे? विचारले तर नकोच सांगतो. सध्या गरज नाही. कुलगुरूपद म्हणजे निवृत्तीच्या उंबरठ्यावरचे उद्योग. अद्यापि भरपूर काम करायचे आहे. शस्त्रक्रिया करायच्या आहेत.’
‘आरोग्य विज्ञानपीठाच्या कुलगुरूपदी तुम्हीच योग्य आहात.’
‘बरेचजण रांगेत आहेत. त्यांना होऊ द्या. गाव-खेड्यातल्या गरीब दृष्टिहीनांची सेवा मला करू द्या. तुमचे ‘युती’चे राज्य येईल तेव्हा पाहिजे तर कुलगुरू होऊ.’ तात्या.
तात्याराव लहाने यांना कुलगुरूपद नको आहे. ते ज्या खुर्चीवर बसलेत ती खुर्ची आपोआप कुलगुरूंची होते. हजारोंच्या डोळ्यांतला अंधकार दूर करून त्यांनी विश्‍व प्रकाशमान केले त्या विश्‍वाचे ते कुलगुरूच आहेत.
हे भाग्य कुणाला मिळाले?
विष पचवणारा धर्मात्मा!
फक्त एका ‘किडनी’वर त्यांचे आयुष्य उभे आहे. हिमालय पर्वत जणू समाजकार्याच्या करंगळीवरच तोलला आहे. गावात कुणीतरी विषप्रयोग केला. दोन्ही किडन्या निकामी झाल्या. तात्यारावांच्या मातेने स्वत:ची किडनी दिली. त्या मातेच्या किडनीचे ऋण ते फेडत आहेत. ‘माझे शरीर, माझे जीवन, माझा आत्मा त्या किडनीरूपी मातेचा. मातेच्या ममतेनेच सेवा करायची’ असेच जणू त्यांनी ठरवले. जे. जे. इस्पितळ म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठे वैद्यकीय साम्राज्य. या साम्राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर ते बसले. तात्यांना अपयशी ठरविण्याचे कारस्थानी विषप्रयोग येथेही झाले. ‘जेथे खरे विष पचवून इतके वर्षे जगतो आहे तेथे कारस्थानांचे विष मला कसे मारणार?’ असे त्यावर डॉक्टरांचे उत्तर.
‘डीन म्हणून जे.जे.ला शिस्त लावली हे बरोबर. पण नवीन काय केलेत?’ यावर तात्याराव म्हणाले, ‘रुग्णांच्या जेवणाची क्वालिटी सुधारली. भाजी आणि आमटीला फोडणीच दिली जात नव्हती. रुग्णांच्या जेवणात ३० मि. ग्रॅम तेल हवेच! तेलाच्या फोडणीशिवाय बेचव जेवण होतं. मी स्वत: भटारखान्यात उभा राहिलो. चार ठिकाणी आता फोडणी दिली जाते. जे.जे.तले तेल आता जे.जे.तल्या जेवणातल्या फोडणीतच वापरतात.’ डॉक्टरांनी हसत सांगितले.
‘मी स्वत: सकाळी ९ वाजता पोहोचतो. जे.जे.तल्या कर्मचार्‍यांनी निदान साडेनऊ वाजता तरी यावे. त्यामुळे ९.३० नंतर कामावर येणार्‍यांचे स्वागत मी ‘गुड आफ्टरनून’ने करतो.
‘गुड आफ्टरनून’ची मात्रा जे.जे.त लागू पडली आणि रुग्णांच्या जेवणाला तेलाची फोडणीही मिळाली. डॉ. लहाने यांचा नेत्र महायज्ञ अव्याहत सुरूच आहे!
डॉ. लहाने यांचा आयुष्याचा मंत्र कसा? हजरत अलीने सांगितल्याप्रमाणे, ‘तुम अच्छा करो और जमाना तुमको बुरा समझे यह तुम्हारे हक मे बेहतर है. बजाय इसके की तुम बुरा करो और जमाना तुमको अच्छा समझे.’
‘लोकांनी माझा उदो उदो करावा म्हणून माझे जीवन नाही. काम करीत राहायचे. बरे-वाईट लोकांनी ठरवायचे. फोडणीचे तेल ज्याचे त्यालाच मिळावे यासाठीच मी राबतोय!’
लहाने यांच्या फोडणीस सलाम!
हे बेघर पहा!
देशातील महानगरांमध्ये सर्वाधिक बेघर हे मुंबई शहरात आहेत. मुंबईत ६५ लाख १५ हजार लोक झोपडपट्ट्यांत राहतात. त्याचवेळी काही श्रीमंत, बडे नोकरशहा मात्र एकापेक्षा जास्त घरे घेत असतात. ‘आदर्श’ सोसायटी प्रकरणानंतर अशा श्रीमंत घरकुल योजनांची रंजक माहिती रोज समोर येत आहे. वांद्रे पूर्व येथील मधुसूदन कालेलकर मार्ग. त्याच्या दक्षिणेस गुरू नानक मार्गाच्या टोकाला गेल्या पाच वर्षांत उभ्या राहिलेल्या हौसिंग सोसायट्या व त्यांचे मालक पहा -
१) जास्मिन - आयपीएस अधिकारी
२) शिवतीर्थ - आयएएस अधिकारी
३) यशश्री - सरकारी अधिकारी
४) सिद्धांत - सरकारी अधिकारी
५) रेणुका - राजकारणी व सरकारी अधिकारी
६) न्यायसागर - न्यायाधीश
या सर्व लोकांनी आपला अधिकार व पदाचा वापर करून जमिनींचे मूळ ‘रिझर्व्हेशन’च बदलले. न्यायसागर, रेणुका व अन्य एका इमारतीसाठी तेथील नाला बंद केला. हे तीनही भूखंड आधी क्रीडा व मनोरंजनासाठी राखीव होते. त्यांचे मूळ आरक्षणच बदलण्यात आले. हे सर्व भूखंड कवडीभावाने देण्यात आले. या सर्व इमारती आज तयार आहेत. त्यातील बहुतेक फ्लॅट मूळ मालकांनी भाड्याने देऊन मासिक उत्पन्नाची अधिकृत सोय केली. न्यायमूर्ती, मंत्रालयातले बडे अधिकारी आणि आमदार-खासदार या तीन गटांतील लोक आपल्या पदांचा गैरउपयोग करून, दबाव आणून कफ परेड, नरीमन पॉइंट, वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील गरीबांसाठी राखीव ठेवलेल्या महागड्या जमिनी गिळंकृत करतात. ते थांबले पाहिजे. बेघर श्रीमंत असो की गरीब, त्यांनाही सामान्य लोकांप्रमाणेच ‘म्हाडा’च्या रांगेत उभे करा. लॉटरी पद्धतीने भूखंड आणि घरे द्या.
पण हे कधी होणार आहे काय?
- संजय राऊत

No comments: