Sunday, January 16, 2011

राष्ट्रीय अध्यक्षांकडून संपत्तीचे प्रदर्शन अयोग्य-सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रीय अध्यक्षांकडून संपत्तीचे प्रदर्शन अयोग्य
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 17, 2011 AT 12:15 AM (IST)

नागपूर - ""राजकीय नेत्यांनी साध्या जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. सार्वजनिक जीवनात वैभवाचे प्रदर्शन करू नये. दीनदयाल उपाध्याय यांचे नाव सातत्याने ओठावर ठेवणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने संपत्तीचे जाहीर प्रदर्शन करणे योग्य नाहीच.'' या शब्दांत भाजपचे एकेकाळचे थिंकटॅंक राहिलेले नेते व विचारवंत गोविंदाचार्य यांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.

नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी यांचे नाव न घेता गोविंदाचार्य यांनी त्यांना कानपिचक्‍या दिल्या. राजकीय पक्षांनी आदर्शवाद जोपासणे गरजेचे आहे. नेत्यांनी संयम बाळगून साधी जीवनशैली ठेवली पाहिजे. दीनदयाल उपाध्याय यांचे सातत्याने नाव घेणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने लग्नसमारंभातून संपत्तीचे असे जाहीर प्रदर्शन करणे योग्य नाही. मी हे नागपुरात बोलतो आहे, याकडे गोविंदाचार्य यांनी लक्ष वेधले. भाजपची चिरफाड करण्यात आपल्याला रस नाही. सत्तेसाठी चटावलेल्या टोळ्यांपैकी (गिरोह) भाजप एक असल्याचे सांगत गोविंदाचार्य म्हणाले, संघाच्या सूचनेवरून आपण 1988 ते 2000 या काळात भाजपात काम केले. भाजपचे धोरण न पटल्याने आपण कुठलाही नकारात्मक दृष्टिकोन न बाळगता पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. मला सत्ता व राजकीय पक्षांमधील स्पर्धेचा भाग बनायचे नव्हते. राजकारणाला मूल्यांच्या व मुद्‌द्‌यांच्या मार्गावर आणण्याचे काम मी करतो आहे. साऱ्याच राजकीय पक्षांवर विदेशी पगडा दिसून येतो, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अर्थशास्त्रातील ज्ञानाविषयी मला काहीही बोलायचे नाही. त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी राजकीय "बेइमानी'साठी केल्याची टीका करताना मोठ्या लोकांच्या छोट्या चुकाही अतिशय महागात पडतात, या शब्दांत त्यांनी सध्याच्या आर्थिक धोरणाबद्दल आपली नापसंती व्यक्त केली.
दहशवादी घटनांमध्ये संघनेत्यांच्या सहभागाविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना गोविंदाचार्य यांनी आताच कुठलेही निष्कर्ष काढणे घाईचे होईल, असे सांगितले. सर्व प्रकरणांचा तपास सुरू असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा ही काही न्यायालय नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मालेगावसारख्या प्रकरणाच्या तपासात तपास यंत्रणा अचानक कशा युटर्न घेतात, यावरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

भारतीय समाज सध्या भ्रष्टाचाराच्या आजाराने ग्रस्त आहे. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी सामजिक पुढाकाराची गरज असल्याचे सांगताना गोविंदाचार्य म्हणाले, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाच्या माध्यमातून 31 जानेवारीला होणाऱ्या कार्यशाळेच्या माध्यमातून भारतीयांच्या विदेशातील काळ्या पैशाबाबत कायदा करण्याची मागणी राष्ट्रपतींना निवेदनाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यार्पणाची तरतूद व्यापक व्हावी, निवडणूक आयोगाला जादा अधिकार असावे, राजकीय व निवडणूक सुधारणांमध्ये नकारात्मक मतांना लोकप्रियता लाभावी, असेही ते म्हणाले. गुलबर्गा येथे अलीकडेच पार पडलेल्या भारत विकास संगमच्या दहादिवसीय अधिवेशनाची माहिती गोविंदाचार्य यांनी यावेळी दिली.
---------------------------------------

No comments: