Wednesday, September 10, 2014

विदर्भात शेतकरी आत्महत्या सत्र:एकट्या झाडगावात आठ दिवसांत तीन शेतकर्‍यांनी संपविली जीवनयात्रा


विदर्भात शेतकरी  आत्महत्या सत्र:एकट्या झाडगावात आठ दिवसांत तीन शेतकर्‍यांनी संपविली जीवनयात्रा


यवतमाळ  : विदर्भात दुबार-तिबार पेरणी न नतर कापसावर व सोयाबीनवर आलेली रोगराई  यामुळे नापिकी संकट त्यातच सरकारने नाकारलेली मदत व पीककर्ज न मिळाल्यामुळे विदर्भात शेतकरी आत्महत्या सत्र पुन्हा सुरु झाले असुन नामदार वसंतराव पुरके यांच्या मतदारसंघातील व यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुक्यातील अवघ्या दोन हजार लोकसंख्येच्या झाडगाव या गावात गणपती, महालक्ष्मी आदी महत्त्वपूर्ण सणासुदीच्या काळात तीन तरुण शेतकर्‍यांनी आपल्या जीवनाचा शेवट विष घेवून केला अशी धक्कादायक बातमी प्रसिद्ध झाली आहे . या प्रकाराने प्रचंड खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे, तरी महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत व पीककर्ज माफी घोषीत करावी अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे . 


 धक्कादायक बातमीत म्हटले आहे की "झाडगाव हे समृद्ध गाव, मंदिराचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावातील जमीन कसदार व भरघोस उत्पन्न देणारी आहे. काही वर्षांपूर्वी या गावामध्ये मोठय़ा प्रमाणात संत्र्याचे उत्पादन घेतले जात होते. मिनी कॅलिफोर्निया म्हणून हे गाव प्रसिद्धीस आले होते. या गावातील बहुतांश घरात महालक्ष्मीची स्थापनाही केले जाते. अशा या गावात आठ दिवसात तीन तरुण शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपविली. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य निराधार झाले व उघड्यावर आले.

१ सप्टेंबर रोजी भास्कर श्रावण करलुके या ३५ वर्षीय तरुणाने विष घेवून आत्महत्या केली. त्याच्यावर झाडगाव सोसायटीचे २५ हजार रुपये कर्ज होते. १.२८ हेक्टर शेती तो वहिती करीत होता. त्याच्या मागे वृद्ध आई, वडील, पत्नी, तीन लहान मुली व मोठा आप्त परिवार आहे. हे कुटुंब उघड्यावर आले आहे.३ सप्टेंबर रोजी मोरेश्‍वर पांडुरंग रेंघे या तरुणाने विष घेवून आपले जीवन संपविले. वडिलांचे नावे ३.९३ हेक्टर शेती आहे. त्याच्यावर अलाहाबाद बँकेचे ६0 हजार रुपये कर्ज आहे. त्याच्या मागे वृद्ध आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. 
विवेक जनार्दन भोयर या २२ वर्षीय तरुणाने ८ सप्टेंबर रोजी विष घेवून आपली जीवनयात्रा संपविली. २५ हजार रुपये कर्ज थकित असल्याने आणि वडिलांच्या आरोग्याच्या चिंतेने त्याने मृत्यूला कवटाळले. वडिलांना उपचारासाठी सावंगी मेघे साठी रवाना केले तर दुसरीकडे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. त्याच्याकडे चार एकर शेती आहे. वृद्ध आई, वडील, मोठा भाऊ असे सदस्य घरात आहेत. 
कर्जबाजारीपणा, नापिकीचे दडपण, कुटुंबाचा दैनंदिन खर्च चालविणे, आरोग्याचा खर्च आटोक्याबाहेर असणे आदी कारणे या तीनही घटनांमध्ये दिसून येते
एकीकडे या वर्षी जून-जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने आदिवासींना मजुरी मिळाली नाही. शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. २००२ च्या यादीप्रमाणे दारिद्र्यरेषेचे कार्ड असल्यामुळे पन्नास टक्के गरीब जनता घरकुलपासून वंचित राहिली. याविषयीच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्याचे समाज कल्याणमंत्री शिवाजीराव मोघे व वसंतराव पुरके यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आपल्या मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून या दोन्ही नेत्यांनी केवळ आपली सोय लावली. हा प्रकार लाजीरवाणा आहे, असा संतप्त सूर उमटला आहे. खावटीसाठी उपासमारीला तोंड देत असलेली आदिवासी जनता या नेत्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी दिला आहे .

No comments: