Saturday, December 3, 2011

विदर्भात डिसेम्बरच्या सुरवातीला ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-विदर्भात तीन लाखांवर कृषिपंपांची वीज तोडली-सकाळ

विदर्भात डिसेम्बरच्या सुरवातीला शेतकऱ्यांच्या आत्महत्या-विदर्भात तीन लाखांवर कृषिपंपांची वीज तोडली-सकाळ

Saturday, December 03, 2011 AT 04:15 PM (IST)

यवतमाळ - कृषिमूल्य आयोग कापसाच्या हमीभावात तातडीने वाढ होणार नाही; तसेच मागील दोन दिवसांत कापसाच्या किमती प्रतिक्विंटल 4,400वरून 3,400 रुपयांवर आले. या पडलेल्या किमतीत शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. या बसलेल्या आर्थिक धक्‍क्‍याने विदर्भात डिसेम्बरच्या सुरवातीला ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी दिली. पुन्हा गुरुवारी (ता. दोन) भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती शुक्रवारी मिळाली.

जागतिक बाजारपेठेत कापसाचे भाव गडगडले आणि पणन महासंघाने एकही संकलनकेंद्र सुरू न केल्यामुळे ग्रामीण भागात हमीभावापेक्षाही कमी भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. या आर्थिक धक्‍क्‍याने विदर्भात डिसेम्बरच्या सुरवातीला ९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामध्ये फत्तू चिंधूजी पायडलवार ( रा. इटगाव , जि. भंडारा), महादेव सपकाल (रा. तातखेद , जि. बुलडाणा),महादेव सरोदे (रा. वाकी रायपूर, जि. अमरावती), ज्ञानेश्‍वर राजमिरे (रा. तळेगाव, जि. यवतमाळ), तुळशीराम मानकर (रा. हेटी, जि. गडचिरोली), एकनाथ मुंदाफळे (रा. खंडाळा. जि. नागपूर), राजेंद्र पवार (रा. अंबोडा, जि. बुलडाणा) आणि दत्ता राठोड (रा. साखरा, जि. यवतमाळ) , (भीमराव कुरसंगे रा. धनोति , जि. वर्धा ), कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा समावेश आहे.


यावर्षी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा ७०७ वर पोचल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी सांगितले.
पवनी तालुक्‍यातील इटगाव येथील फत्तू चिंधूजी पायडलवार (वय 32) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गुरुवारी (ता. एक) विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.

फत्तू पायडलवार यांनी सुमारे एका वर्षापासून विविध सेवा सहकारी संस्थेकडून 50 हजार रुपये, कोंढा येथील येशूबाई पतसंस्थेतून 30 हजार व सोने गहाण ठेवून सुमारे दीड लाख रुपये कर्जाऊ घेतले होते. दोन एकर शेतीतून पुरेशा प्रमाणात उत्पन्न होत नसल्यामुळे आणि कर्जाचा ताण वाढत असल्याने गुरुवारी (ता. एक) दुपारी एक वाजता घरी कोणी नसताना फवारणीचे औषध त्यांनी प्राशन केले. त्यांना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली. तपास सुरू
विदर्भात तीन लाखांवर कृषिपंपांची वीज तोडली

कापसाच्या कमी भावामुळे शेतकरी आत्महत्या करीत असताना राज्य सरकार सरसकट ट्रान्स्फार्मर, रोहित्र व फीडर काढून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करीत आहे. हवालदिल कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून जोपर्यंत थकीत बिलाची वसुली होत नाही, तोपर्यंत ट्रान्स्फार्मर व फीडर लावण्यात येत नसून, अशाप्रकारे मागील पंधरवड्यात संपूर्ण विदर्भातील तीन लाखांवर कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या तीन लाख कृषिपंपांमध्ये यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यांतील आदिवासी भागाचा समावेश आहे. दरम्यान, सरकारने सर्व आदिवासी व बहुजन समाजाच्या शेतकऱ्यांची थकीत देयके आदिवासी व सामाजिक सुरक्षेच्या निधीतून वीज कंपनीला तत्काळ देऊन तोडगा काढावा, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
या धोरणामुळे सरसकट ट्रान्स्फार्मर काढल्यामुळे पैसे भरलेल्या शेतकऱ्यांनाही वीज मिळत नाही. हा जुलमी कारभार सर्वत्र सुरू असून, 10 डिसेंबरपर्यंत सर्व थकीत असणाऱ्या कृषिपंपांचे विद्युत कनेक्‍शन तोडण्यासाठी ग्रामीण भागातील थ्री-फेजचा पुरवठा सरसकट बंद करण्याचा कट कंपनीने रचला आहे.
या गंभीर प्रश्‍नावर सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची थकबाकी डिसेंबरपर्यंत स्थगित करावी व नापिकी असणाऱ्या नैराश्‍यग्रस्त शेतकऱ्यांच्या कृषिपंपांवरील थकबाकी पूर्णपणे माफ करावी व विद्युत कंपनीने काढलेले सर्व ट्रान्स्फार्मर, रोहित्र व फीडर तत्काळ लावावे, अशी मागणी करणारे निवेदन विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहे

No comments: