Thursday, February 25, 2010

विदर्भासाठी 30 हजार कोटी हवेत- तिवारी...-सकाळ वृत्तसेवा



विदर्भासाठी 30 हजार कोटी हवेत- तिवारी
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 25, 2010 AT 12:00 AM (IST)
http://72.78.249.107/esakal/20100225/4866467122240106576.htm
नागपूर - आत्महत्याग्रस्त विदर्भात विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रणव मुखर्जी यांच्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात किमान 30 हजार कोटी रुपयांची तरतूद असावी, अशी अपेक्षा येथे व्यक्त होत आहे. येत्या 26 तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच या भागाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष असून विकासाचे मोठे "पॅकेज' दिल्याशिवाय विकास होणार नाही, असे मत विदर्भ जनआंदोलन समितीने व्यक्त केले आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या तीन वर्षात तीन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, हा निधीही पुरेसा नसल्याने त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, याकडे समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी लक्ष वेधले आहे. या भागाचा सिंचन, पिण्याचे पाणी आणि अन्य विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात 30 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सन 2006 पासून राज्य शासनाने या भागात विकास कामांसाठी 5 हजार 825कोटी रकमेची दोन "पॅकेज' जाहीर करण्यात आली आहेत. त्यांतर केंद्र शासनाने 4 हजार 600 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. तर राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी 1 हजार 100 कोटी रुपयांची आहे. यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसून विकासात मागे पडल्यामुळे वेगळ्या राज्याची मागणी पुढे येत असल्याचे तिवारी यांनी पुढे म्हटले आहे. राज्यात आतापर्यंत किमान 50 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यातील बहुतांश आत्महत्या विदर्भातील आहेत. आत्महत्यांच्या या प्रदेशात शेतकऱ्यांच्या विधवा आणि त्यांच्या मुलांसाठी कोणतीही योजना नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

No comments: