Tuesday, July 20, 2010

कृषीमंत्र्यांमुळेच खताचा काळाबाजार ; विदर्भ जनआंदोलन समितीचा आरोप

कृषीमंत्र्यांमुळेच खताचा काळाबाजार ; विदर्भ जनआंदोलन समितीचा आरोप


http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=87496:2010-07-20-17-25-38&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी
कृषी अधिकारी बदलीच्या घोडेबाजारात गुंतले असल्याने खत टंचाई होऊन काळा बाजार सुरू झाला. यासाठी कृषी मंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. खत टंचाईला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा दावाही समितीने केला आहे. गेल्या १ जुलैपासून कृषी मंत्रालयातून बदली व पदोन्नतीचे आदेश जारी होत आहेत. पॅकेज अंतर्गत पाणलोटसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी आलेल्या जिल्ह्य़ांमध्ये नियुक्तीसाठी धडपड सुरू आहे. त्यामुळेच विदर्भ व मराठवाडय़ात खत टंचाई निर्माण होऊन काळाबाजार होत आहे. ३१ मे पूर्वी बदली व पदोन्नतीचे निर्णय व्हावे, असे शासनाचे धोरण असताना कृषी मंत्रालयात जुलैमध्ये बदल्या व पदोन्नती कशा सुरू आहेत, असा सवाल समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
कृषी मंत्र्यांनी १ ते १३ जुलैदरम्यान शंभरहून अधिक बदल्या केल्या आहेत. यात जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा गुण नियंत्रक, तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मंत्र्यांच्या सचिवांनी ४५० पदांवरील बदली व पदोन्नतीची यादी तयार केली आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून पदोन्नती करण्यात येत आहेत. यात कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.
विदर्भाच्या यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलडाणा, वर्धा व चंद्रपूर आदी जिल्ह्य़ांसाठी असलेला खत पुरवठा कृषी मंत्रालयाने मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला आहे. नागार्जुन आणि गोदावरी कंपनीचे शेकडो टन खत युरिया व रासायनिक खताचा काळाबाजार सुरू आहे. यास कृषी मंत्री जबाबदार आहेत. गेल्या आठवडय़ाभरापासून खतासाठी भटकणारा हिवरा येथील शेतकरी चिमन आत्राम याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा दावाही समितीने केला आहे.
===============

No comments: