Monday, March 14, 2011

आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला सेवानिवृत्त पोलीस महासंचालक-लोकसत्ता

आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला सेवानिवृत्त पोलीस महासंचालक-लोकसत्ता
Print
प्रशांत देशमुख, वर्धा, १४ मार्च
http://loksatta।com/index.php?option=com_content&view=article&id=142919:2011-03-14-17-46-41&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60

वर्धा जिल्ह्य़ातील ७०० व यवतमाळ जिल्ह्य़ातील १४०० अशा एकविसशे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास तूर्तास दर महिन्यास आर्थिक मदत आणि वर्षभराने या कुटुंबाचे कायमस्वरूपी आर्थिक पुनर्वसन करण्याचा प्रयत्न राज्याचे माजी पोलीस महासंचालक अनामी रॉय यांच्या ‘वंदना’ या संस्थेमार्फ त सुरू झाला आहे. संकटाचे आभाळ कोसळलेल्या या शेतकऱ्यांप्रती ही आमची एक छोटीशी वंदना होय, असे वरिष्ठदर्जाच्या सेवानिवृत्त एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने सामाजिक कार्यात असा सक्रिय होण्याचा मान संपादन करणाऱ्या अनामी रॉय यांनी सांगितले.
येथील बजाजवाडीतील वृक्षांच्या छायेखाली आज एक छोटेखानी समारंभ गाजावाजा न करता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आत्महत्या झालेल्या शेतकरी कुटुंबातील विधवा, पित्याचे छत्र हरवलेली मुले, कुटुंबातील मुलांना एकमेव आधार असणारे त्यांचे आजोबा उपस्थित झाले होते. वंदना संस्थेने गेल्या चार महिन्यात केलेल्या सर्वेक्षणातून प्राधान्याने या कुटुंबांची निवड केली गेली.
साध्या व्यासपीठावर अनामी रॉय, बजाज प्रतिष्ठानच्या मीनल बजाज व अ.वि.जोशी व गांधी विचार प्रतिष्ठानचे भरत महोदय उपस्थित होते. एकूण ६५ कुटुंबांना मदत देण्यात आली. प्रत्येकीस एक हजार रुपये दर महिना याप्रमाणे आगामी बारा महिन्याचे धनादेश बजाज यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आले. यावेळी यादीतील नावे स्वत: वाचून रॉय शेतकरी विधवांशी संवादही साधत होते. कुटुंबाची स्थिती, मुलांचे शिक्षण, उदरनिर्वाहाचे साधन, याबाबत माहिती घेतानाच त्यांनी भविष्यातही मदत करू. धीर सोडू नका, असा सहानुभूतीचा शब्द दिला. कुणाचेही भाषण झाले नाही. धनादेशाचे वाटप संपल्यावर सोबत आणलेल्या जेवणाचे तयार डबे त्यांनी प्रत्येकाला जवळ जाऊन दिले. दूरवरून आलेल्या या महिलांनी कार्यक्रम स्थळीच जेवणाचा आनंद घेतला. कार्यक्रम संपला. कधीच धनादेश न पाहणाऱ्या विधवांना त्याबाबत रॉय यांनी स्वत: माहिती दिली. बँकेत खाते उघडण्यास सांगितले. अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क साधा, असे सांगून स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक देत त्यांनी आश्वस्त केले. एका अडचणीतील महिलेला खाते काढण्यासाठी जवळचे दोनशे रुपये देणाऱ्या रॉय यांनी या प्रसंगाचे छायाचित्र घेऊ देणे नम्रपणे नाकारले.
‘छायाचित्र नको. कारण, त्यामुळे प्रसिद्धी होते. आधीच अडचणीत असणाऱ्या महिलांना अशी मदत मिळते म्हटल्यावर तिच्याकडे नातेवाईकांचा ससेमिरा सुरू होतो. मिळालेली मदत तिला नकोशी होती’, असा आपला अनुभव असल्याचे अनामी रॉय यावेळी म्हणाले. या उपक्रमाबाबत कार्यक्रम झाल्यावर खास लोकसत्ताशी रॉय यांनी संवाद साधला. ‘निवृत्त झाल्यावर मोठमोठय़ा नोकरीच्या ऑफ र्स आल्या, पण त्या नाकारल्या. नोकरीत असतानाच सामाजिक ऋण फे डण्याचा विचार सुरू झालेला होता. त्यामुळेच वंदना संस्थेची कल्पना साकारली. मुंबईतल्या झोपडपट्टीवासीयांसाठी काम सुरू आहे. मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या वारंवार माध्यमातून वाचायला, बघायला मिळत होती म्हणून या प्रश्नाकडे वळलो. वर्धा व यवतमाळ हे सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत म्हणून त्यांची निवड केली. चार पाच महिन्यापूर्वी सर्वेक्षण केले. अनेक कुटुंबांशी बोललो. समस्येची भयावहता कळली. त्यानुसार प्राधान्य ठरवून कुटुंबांना मदतीचा हात देणे सुरू केले आहे. वर्षभर ही मदत मिळेल. मात्र, त्याने प्रश्न सुटणार नाही म्हणून कुटुंबातील सदस्यांच्या क्षमतेनुसार त्याचे कायमस्वरूपी आर्थिक स्वावलंबन साधेल, अशी रोजगार स्वरूपात मदत करण्याचे ठरवले आहे. एका गावातील एका महिलेला विचारले, म्हैस घेऊन देऊ कां? तर ती उत्तरली, आमचेच खायचे वांधे आहेत. म्हशीसाठी कुठून चारा आणू? तर, दुसऱ्या एका महिलेने मात्र, बकऱ्या द्या. त्यांना पोसून व पिल्लांची विक्री करून भागेल, असे ती म्हणाली. काहीना शिवणयंत्र देण्याचा विचार आहे. गावातल्याच घरी ती काही करू शकेल. मुलांना शिकवू शकेल. असा मदत देण्याचा प्रयत्न आहे.’
वर्धा जिल्ह्य़ाची निवड कां, या प्रश्नावर रॉय म्हणाले, ‘बजाज प्रतिष्ठानशी आमचा समन्वय आहे. त्यामुळे वर्धेत काम करणार असल्याचे कळल्यावर त्यांनी स्वत: मदतीचा हात दिला. वध्र्याला पोलीस अधीक्षक होतो पण, आत्महत्यांची तीव्र समस्या हेच प्रमुख कारण आहे. मदतीसाठी माझाच व्यक्तिगत पैसा नाही. उद्योगसमूह, देणगीदार, स्वयंसेवी संस्था अशांच्या माध्यमातून पैसा उभा होतो. आपण विश्वस्ताच्या भूमिकेतून पुढाकार घेतला आहे, असे नमूद करीत रॉय यांनी हा ‘पोलीसवाला’ पैसा नसल्याचे जणू अप्रत्यक्ष सूचित केले. ४० वर्ष महाराष्ट्रात काढली. आता येथेच निवृत्तीनंतर काम नाही करणार, तर कुठे करणार, असेही ते म्हणाले.

या संवादानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या शेतकरी कुटुंबातील नीलिमा नावाच्या बारा वर्षे वयाच्या निरागस मुलीने रॉय यांना प्रश्न केला, मी तर तुमच्या मदतीतून शिकेल, पण माझ्या आई व आजीचा सांभाळ करण्यासाठी माझ्या भावाला नोकरी लावून द्या नं? भविष्याची चाहुल घेणाऱ्या या प्रश्नावर रॉय यांनीही तत्परतेने प्रतिसाद दिला. एका महिन्यात तुझ्या भावाला कुठेतरी लावून देतो. निश्चिंत राहा. आत्महत्यानंतर सहानुभूती दर्शवण्यास कॅमेऱ्यासह येणाऱ्या नेत्यांपेक्षा आज आलेला मदतीचा हात निश्चितच घर सावरणारा आहे, असा भाव महिलांच्या चेहऱ्यावर यावेळी टिपायला मिळाला. आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण घेण्यासाठी राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक जोग यांनी याआधी पुढाकार घेतला त्यानंतर अनामी रॉय हे दुसरे पोलीस अधिकारी आहेत.

No comments: