Wednesday, October 19, 2011

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका, पदांचे राजीनामे द्या कापूस हमी भाव वाढीचे कागदी घोडे

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका, पदांचे राजीनामे द्याPrint
कापूस हमी भाव वाढीचे कागदी घोडे
यवतमाळ, १९ ऑक्टोबर / वार्ताहर

altदिवाळी तोंडावर आली असताना आणि कापूस पणन महासंघाची खरेदी सुरू झालेली नसताना खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्यायच नसल्याने ‘वाट्टेल त्या भावात’ खरेदी होत असून शेतकऱ्यांचे शोषण होत आहे, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. पणन महासंघासह विविध संघटना आणि नेते केवळ हमीभाव सहा हजार रुपये असावा, सात हजार रुपये असावा, नऊ हजार रुपये असावा, अशा केवळ मागण्या करून कागदी घोडे नाचवत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशी टीका ‘विदर्भ जनआंदोलन समिती’ चे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला, नंतर पाहिजे तेव्हा आला नाही, खतांचा तुटवडा होता, कापसावर रोगांचे अतिक्रमण आले. परिणामी, यंदा कापसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घटणार हे उघड आहे. अशा स्थितीत कापसाला किमान सहा हजार रुपये हमीभाव आणि प्रती क्विंटल चार हजार रुपये बोनस सरकारने दिला पाहिजे.
शेतकऱ्यांसाठी सरकार काहीच करत नाही व पणन महासंघासह सारेजण केवळ मागण्यांचे कागदी घोडे नाचवत आहेत, असे तिवारी यांनी एका पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्रात ५२ लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रात कपाशी आहे मात्र, सर्वत्र उत्पादनात घट येणार आहे. दिवाळी तोंडावर आहे. कापूस खरेदीसाठी सरकार तयार नाही. खाजगी व्यापारी या संधीचा फायदा घेऊन मनमानेल त्या भावात कापूस खरेदी करत आहेत.
पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी म्हणतात, हमी भाव सहा हजार रुपये द्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे म्हणतात, किमान पाच हजार रुपये हमीभाव द्या, कापूस परिषदेत सात हजाराची मागणी झाली, तर काही संघटनांनी नऊ हजाराची मागणी केली, पण प्रत्यक्षात कोणी काहीही करत नाहीत.
सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे व आमदार नीलेश पारवेकर सोनिया गांधी यांना दिल्लीत भेटले आणि सात हजार रुपये हमीभाव असावा, अशी मागणी केली. हे सारे प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे. या नेत्यांनी एकतर हमीभाव सात हजार रुपये मिळवून द्यावा किंवा पदांचे राजीनामे तरी द्यावेत आणि रस्त्यावर येऊन आंदोलन करावे, असे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीने केले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे हाल आहेत, त्यांची दिवाळी अंधारात जाणार हे कटूसत्य आहे, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.

No comments: