Sunday, November 20, 2011

‘विदर्भातील शेतकर्‍यांना पॅकेज द्या’-lokmat mumbai

‘विदर्भातील शेतकर्‍यांना पॅकेज द्या’
मुंबई - विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना अल्पकालीन मदत म्हणून शासनाने पॅकेज जाहीर करून प्रति हेक्टर २0 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
कापूस आणि सोयाबीनला दरवाढ मिळावी, यासाठी राज्यात आंदोलन तापले आहे. त्याबाबत, मुख्यमंत्र्यांनी तिवारी यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांशी सुमारे दीड तास चर्चा करून समितीचे म्हणणे त्यांनी ऐकले. या भेटीनंतर किशोर तिवारी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्याने विषय समजून घेतला असून ते दिलासा देणारा निर्णय घेतील, अशी आशा आहे.
अडचणीतील शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी २0 हजार रुपयांची मदत द्यावी. ही रक्कम पीक कर्जात जमा करुन पुढील पीककर्ज उपलब्ध करून द्यावे. पुढील पीक येईपर्यंत सरकारने शेतकर्‍याला अन्न सुरक्षा द्यावी तसेच शेतकर्‍यांच्या शेतात रोजगार हमीची कामे तत्काळ सुरू करण्यात यावीत. सहा जिल्ह्यांतील आरोग्य सेवा सक्षम करुन दारूबंदी जाहीर करावी, आदी मागण्याही केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत २३ नोव्हेंबरला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन आपण चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे, तिवारी यांनी सांगितले

No comments: