Wednesday, December 7, 2011

गोकुळसर्‍यात पेटते एक वेळ चूल - मुख्यमंत्र्यांच्या सभेत विष घेणार्‍या शेतकर्‍यांच्या गावातील वास्तव-लोकमत

गोकुळसर्‍यात पेटते एक वेळ चूल - मुख्यमंत्र्यांच्या सभेत विष घेणार्‍या शेतकर्‍यांच्या गावातील वास्तव-लोकमत
(06-12-2011 : 23:32:36) Share
दि. ५ (धामणगाव रेल्वे)
दीडशे शेतकर्‍यांवर अर्धा कोटी रुपयांचे कर्ज, पांढर्‍या सोन्याला भाव नसल्याने घरातच कापूस पडलेला, मुलांचे शिक्षण, मुलीच्या विवाहाची चिंता अशा स्थितीत गावात एकाच सांजेला चूल पेटते. हे वास्तव आहे गोकुळसरा गावातील. काल रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेत विष प्राशन करणारा अरुण सबाने हा शेतकरी याच गावातील रहिवासी आहे.
धामणगाव (रेल्वे) तालुक्यातील गोकुळसरा या गावातील अरुण देवीदास सबाने या शेतकर्‍याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारसभेत त्यांच्या भाषणाला सुरुवात होताच विष प्राशन केले. या शेतकर्‍याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या शेतकर्‍याच्या कृतीमागील वास्तव भीषण व अंगावर काटा उभे करणारे आहे. वर्धा नदीकाठी वसलेल्या गोकुळसरा गावाची लोकसंख्या ६00 असून १५२ शेतकरी कापूस उत्पादक आहेत. ३00 हेक्टर शेतजमिनीवर बँक, सोसायटी यांचे अध्र्या कोटींहून अधिक रकमेचे कर्ज आहे. शेतात कपाशीची लागवड केली आहे. एकीकडे कापसाला भाव नसल्याने घरात शेकडो क्विंटल कापूस पडून आहे, तर दुसरीकडे शेतातही कापूस दिसत आहे. घरात कापूस असतानाही व्यापार्‍यांचे देणे चुकते करता येत नाही.
अरुण सबाने यांच्या नावे तीन एकर, पत्नी ललिताच्या नावे तीन, मुलगा हितेश याच्या नावे साडेतीन एकर, तर छोटा राजेंद्र याच्या मालकीचे साडेतीन एकर अशी एकूण १३ एकर शेती आहे. शेतीच्या उत्पन्नातून घरखर्च चालतो. यंदा स्टेट बँकेचे १ लाख ६0 हजार रुपये आणि खासगी एक लाख रुपये कर्ज घर बांधणीसाठी घेतले होते. घरी २५ क्विंटल कापूस पडून आहे. भाव नसल्याने तो विकता येत नाही. दोन दिवसांपूर्वी व्यापार्‍याकडे अरुण गेला असताना त्यानेही अल्पभावात कापूस मागितला होता. त्यामुळे त्यांनी कापूस विक्रीला नेला नाही.

No comments: