Saturday, December 24, 2011

अपुर्‍या पॅकेजमुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होणार! -किशोर तिवारी यांनी वर्तविली भीती

अपुर्‍या पॅकेजमुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होणार! -किशोर तिवारी यांनी वर्तविली भीती

लोकशाही वार्ता/२४ डिसेंबर


यवतमाळ : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पॅकेजची मदत जाहीर करून ९0 लाख हेक्टरमधील सुमारे ७ लाख शेतकर्‍यांची निराशा केली आहे. अपुर्‍या मदतीच्या घोषणेमुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व खानदेशमध्ये नापिकी झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा तर मिळणार नाही व नैराश्य वाढून प्रचंड आत्महत्या होण्याची भीती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
वारंवार निवेदन करूनही मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या शेतीमालाच्या मागणीला बगल देऊन मदत जाहीर करतानाही झालेल्या नुकसानीच्या जेमतेम ५ टक्के मदत जाहीर करून सरकारने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सरकारने कापसासाठी हेक्टरी ४ हजार रुपये तर सोयाबीन व धानासाठी हेक्टरी २ हजार रुपये मदत दिली. ही तर अपुरीच होती. त्यामध्येच ही मदत जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत राहील, अशी घोषणा करून नोकरशाहीने पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.
सरकारच्या पॅकेजच्या मदतीपेक्षा १0 पट असून सरकार शेतकर्‍यांच्या जिवावर उठले असून शेतकर्‍यांसाठी राजकीय पक्षांचे सर्वच आंदोलन सरकारने थोतांड सिद्ध केले आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकार अशा प्रकारे पळ काढू शकत नाही व त्यांना कापसाचा हमीभाव व नापिकीमुळे झालेली नुकसान भरपाई पश्‍चिम महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकर्‍यांप्रमाणेच द्यावी लागेल, असा इशारा विदर्भ जनआंदोलन समितीने दिला आहे.

No comments: