Thursday, December 15, 2011

नागपूर-हैदराबाद मार्गावर शेतकरी विधवांचा रास्तारोको-विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन

नागपूर-हैदराबाद मार्गावर शेतकरी विधवांचा रास्तारोको-विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन

नागपूर-हैदराबाद मार्गावर शेतकरी विधवांचा रास्तारोको-विदर्भात ठिकठिकाणी आंदोलन

लोकशाही वार्ता/१५डिसेंबर

पांढरकवडा : विदर्भ जनआंदोलन समितीच्या नेतृत्वात शेतकरी विधवा आणि शेतकर्‍यांनी तुळजापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर आज अर्जुना येथे रास्तारोको आंदोलन करून दीड तास वाहतूक रोखली आणि शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. सुमारे सहाशे आंदोलकांमध्ये बोथबोडन, वारा कवठा, भोपा मांडवी, पाटणबोरी व इतर गावातील शेतकरी विधवा सहभागी झाल्या होत्या.
तसेच, गजानन बेजंकीवार यांच्या नेतृत्वात पाटणबोरी येथे नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरही वाहतूक रोखण्यात आली होती. वणी, उमरखेड येथेही रास्तारोको आंदोलन झाले, तर राळेगाव येथे आघाडी सरकारची तेरवी करण्यात आली! दारव्हा येथे शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.
कापसाला चांगला भाव देण्यासाठी काल जाहीर केलेले पॅकेज वाढवून द्यावे, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. सरकारने कापूस, सोयाबीन, धान या पिकांचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा, पॅकेजची मदत कमीत कमी दहा हजार रुपये प्रतिहेक्टर असावी अशी मागणी करणार्‍या या आंदोलकांना अटक केल्यानंतरच राष्ट्रीय महामागार्ंवरील आणि इतरत्रची वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पॅकेजवर फेरविचार करण्याची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. सरकारने कोरडवाहू शेतकर्‍यांना नगदी अनुदान द्यावे, त्यांना आरोग्यसेवा, शिक्षण, अन्न सुरक्षा व रोजगार या क्षेत्रांसाठी विशेष सोयीसवलती द्याव्या अशा मागण्या किशोर तिवारी यांनी केल्या. दीडशे शेतकर्‍यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

No comments: