Wednesday, July 24, 2013

विदर्भातील १0 लाख हेक्टरमधील पिके बुडाली

विदर्भातील १0 लाख हेक्टरमधील पिके बुडालीमागील २ जूनपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे विदर्भात अती पाऊस व पुरामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण विदर्भातील १0 लाख हेक्टर खरीप पिके नष्ट झाली असून शेतकर्‍यांना कमीतकमी २0 हजार कोटींचा फटका बसला आहे, तर उर्वरित २५ लाख हेक्टर मधील कापूस, सोयाबीन व धानाचे पीक नापिकीग्रस्त झाले आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे ही पिकेही डुबण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने २५ हजार रुपये प्रतिहेक्टर घोषित केलेली मदत १0 लाख हेक्टरच्या सर्व शेतकर्‍यांना कोणतीही अट न घालता सरसकट तत्काळ द्यावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.
या वर्षी महिन्याभर्‍यात पडणारा १00 मिमी. पाऊस एकाच दिवसात पडत आहे. मागील गुरुवारी चंद्रपूर येथे तर एकाच दिवसात सुमारे ३00 मीमी. पावसाची नोंद करण्यात आली. अशाच प्रकारे भयंकर पाऊस संपूर्ण विदर्भात पडत असून ४ महिन्यांच्या मान्सूनमध्ये पडणार्‍या पावसाची सरासरी ४ आठवड्यात पूर्ण झाली आहे. यामुळे संपूर्ण पिके नष्ट होऊन पुराच्या तडाख्याने हजारो घरांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकारी पोहोचलेच नसल्याने विषयाची गंभीरता त्यांना कळलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत्या शनिवार व रविवारला पूरग्रस्त भागाचा हवाई दौरा करणार असून नापिकीग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देणार असल्याचे बोलल्या जात आहे. यावरच आता शेतकर्‍यांच्या आशा टिकून आहेत. या वर्षी शेतकर्‍यांनी दुबार व तिबार पेरणी केल्याने कोरडवाहू सोबतच सिंचन सुविधा असणारे, तर अल्प भूधारक सोबत मोठे शेतकरीही प्रचंड अडचणीत आले आहेत. अती पावसामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. मागील २ दिवसात मंगी येथील संतोष सिडाम व ठाणेगाव येथील अनिल मरापे यांच्या आत्महत्येकडे किशोर तिवारी यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कर्जबाजारी व नैराश्यग्रस्तांच्या आत्महत्या टाळण्यासाठी सरकारने या शेतकर्‍यांना आर्थिक मदत, नवीन पीककर्ज, ६ महिन्यांसाठी अन्नसुरक्षा, सर्व शेतकर्‍यांच्या मुलांना मोफत उच्चशिक्षण व मोफत आरोग्य सुविधा देण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
विदर्भात नगदी पीक कापूस व सोयाबीनचे नुकसान प्रचंड प्रमाणात झाले आहे. आता त्या ठिकाणी पर्यायी पिके तूर व ज्वारी घेण्यासाठी व उशिरा खरीपमध्ये घेण्यात येणार्‍या परंपरागत पिकाकडे शेतकर्‍यांनी वळावे याकरीता सरकारने विशेष अनुदान द्यावे व त्याकरिता कृषी विभागाने विशेष योजना सुरू करावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे

No comments: