Wednesday, January 8, 2014

शरद पवारांचे ५५ कोटींचे कृषी प्रदर्शन- -शेतकरी विधवांचा प्रखर विरोध-प्रदर्शनाचा निधी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना द्या-तभा वृत्तसेवा

शरद पवारांचे ५५ कोटींचे कृषी प्रदर्शन-

-शेतकरी विधवांचा प्रखर विरोध -प्रदर्शनाचा निधी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना द्या-तभा वृत्तसेवा

यवतमाळ, ८ जानेवारी

undefinedकृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने नागपूर येथे ५५ कोटी रुपये खर्च करून फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात कापूस संशोधन संस्थेच्या पांजरी येथील आवारात आयोजित अखिल भारतीय कृषी प्रदर्शन ‘कृषी वसंत’चे आयोजन केले आहे. विदर्भातील आत्महत्या केलेल्या १० हजार शेतकर्‍यांच्या विधवांनी या प्रदर्शनाला प्रखर विरोध केला आहे.
 विदर्भातील ३० लाख शेतकरी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असताना, आत्महत्येचा मार्ग अवलंबित असताना, ३ हजार कोटींची मदत घोषित करून एक दमडीही या सरकारने दिलेली नाही. सार्‍या भारतात शेतकर्‍यांच्या आत्महत्येची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भात ५५ कोटी रुपये खर्च करून कोरडवाहू शेतकर्‍यांच्या दिवाळीखोरी व आत्महत्येला निमंत्रण देणारे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे तंत्रज्ञान विकण्याचा गोरखधंदा शरद पवार यांनी बंद करावा, अशी मागणी विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या अध्यक्ष बेबी बैस यांनी केली आहे.
 महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य कृषी सचिव डॉ. सुधीर गोयल यांच्याप्रमाणे शरद पवार यांनी कृषी प्रदर्शनाला ४५ कोटी रुपये, तर महाराष्ट्र सरकारने १० कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून दिले आहेत. संपूर्ण भारतातून १० लाख शेतकरी नागपूरला येणार असून यासाठी नागपूरमधील १३० मंगल कार्यालये, सर्व सरकारी निवासस्थाने आरक्षित करण्यात आले असून शेकडो बसेस, रेल्वे बुक करण्यात आल्या आहेत. या शेतकर्‍यांना सरकार ज्या कापूस तंत्रज्ञानामुळे विदर्भात मागील दशकात १० हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या ते ‘तंत्रज्ञान’ दाखविणार काय, असा प्रश्‍न शेतकरी विधवा अपर्णा मालीकर यांनी उपस्थित केला आहे.
 सध्या विदर्भ ही शेतकर्‍यांच्या आत्महत्येची राजधानी होत असताना नागपूर कृषी प्रदर्शन भरविणार्‍यांच्या राजधानीचे स्थान म्हणून समोर येत आहे. भारतात सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र आहेत, कापूस संशोधन परिषदेचे भारताच्या चारही दिशांना संशोधन केंद्रे आहेत व राष्ट्रीय स्तरावर शेकडो कृषी विद्यापीठे आहेत. तरीही नागपूरला सार्‍या देशातील शेतकरी आणून त्यांना विदेशी कृषी तंत्रज्ञान दाखविण्याचा ‘प्रयोग’ शरद पवार करत असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे.
 या प्रयोगाला विदर्भातील शेतकरी विधवांचा नैतिक विरोध असून हे सरकार डॉ. स्वामीनाथन समिती व डॉ. नरेंद्र जाधव समिती यांच्या शिफारशी मान्य करूनही काहीच करत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. उपासमारीला तोंड देत असलेल्या १० हजार शेतकरी विधवांना साधे अन्न व आरोग्य सुरक्षा आणि शिक्षण सवलती देण्यासाठी सरकारांजवळ पैसे नाही हे कारण समोर करीत आहे. त्या केंद्र व राज्य सरकारांजवळ ‘या‘ उधळपट्टीसाठी ५५ कोटी रुपये कसेे उपलब्ध झाले, असा सवालही शेतकरी विधवांनी केला आहे.
 सरकारने हे नियोजित ‘कृषी वसंत’ प्रदर्शन रद्द करून ४५ कोटी रुपये विधवांच्या कल्याण निधीला दिले नाही, तर प्रदर्शनाच्या पांजरी येथील मुख्य दारासमोर शेतकरी विधवांचा उपोषण सत्याग्रह सुरू होईल, असा इशारा शेतकरी विधवांच्या हक्कसाठी लढणारे विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.

No comments: