Sunday, December 30, 2012

तेलंगणासोबत वेगळ्या विदर्भाचीही निर्मिती करा-केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन

तेलंगणासोबत वेगळ्या विदर्भाचीही निर्मिती करा-केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन 
स्थानिक प्रतिनिधी/३0 डिसेंबर
यवतमाळ : सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा प्रदेश व आदिवासींच्या कुपोषणाची राजधानी असलेला विदर्भ अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. विदर्भाचे वेगळे राज्य केल्याशिवाय तेथील समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे वेगळा तेलंगणा राज्यासोबत विदर्भही वेगळा करावा, असे आवाहन विदर्भ जनआंदोलन समितीने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात केले आहे.
शेतकरी आत्महत्या, उपेक्षित आदिवासींसोबत वाढत्या बेरोजगारीमुळे विदर्भाचे मागासलेपणे दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने विदर्भातील उपेक्षित शेतकरी व आदिवासींसाठी खर्च केलेले १ कोटी रुपये गरजवंतांपर्यंत पोहोचलेच नाही. विदर्भात मागील दशकात एक टक्काही सिंचनक्षमता वाढली नाही. विद्युत निर्मितीचे केंद्र विदर्भात असताना येथील जनतेला भारनियमनाचा सामना करावा लागतो.
विदर्भातील औद्योगिक मागासलेपणामुळे येथील जनता बेरोजगार आहे. येथील १0 लाखावर युवक मागील दशकता अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षक घेऊन पुणे, मुंबई, हैदराबाद व बेंगरूळु येथे काम करत आहे. सरकारच्या विदर्भविरोधी धोरणामुळे येथील २ हजारांच्या वर उद्योग बंद आहेत. विदर्भावर होत असलेल्या अन्यायासाठी कोणतेही पाऊले उचलले जात नसून येथे नक्षलवाद वाढत आहे. अशा परिस्थितीत विदर्भात असंतोषाची लाट निर्माण होऊन हिंसाचार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र विधी मंडळाने विशेष ठराव केला असून या मागणीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.
भाजपा व मनसेसोबत सर्व दलित नेतेसुद्धा एकमुखाने विदर्भाला न्याय देण्यासाठी विदर्भ राज्य निर्माण व्हावे, हाच नारा लावत आहेत. स्वत: केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विदर्भाच्या समस्या व दु:ख जाणले असून विदर्भाच्या विकासासाठी व शेतकरी व आदिवासींच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी योजना आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.


No comments: