भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीची करु नये माती..-किशोर तिवारी
किशोर तिवारी,
(अध्यक्ष - कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन , महाराष्ट्र राज्य )
+919422108846
kishortiwari@gmail.com
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्षांची महायुती एकजुटीने निवडणुकीला सामोरे गेली. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात युती ने निवडणूक रिंगणात उतरून प्रचंड यश मिळविले. त्या पूर्वी मातोश्री वर झालेल्या सविस्तर बोलणीत ५०:५० चा फॉर्म्युला ठरला होता.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासप प्रमुख महादेव जानकर, रयत क्रांतीचे संघटनाप्रमुख सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटना प्रमुख विनायक मेटे हे सर्व महायुतीचे नेते एकत्र निवडणूक प्रचार करीत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बांद्रा बीकेसी येथील मैदानात झालेल्या महायुतीच्या विराट सभेत उद्धव जी ठाकरे, रामदास आठवलेंसहीत भाजप शिवसेना महायुतीच्या नेत्यांनी एकजुट दाखविली होती. लोकांनी विश्वास दाखवीत युती ला बहुमत दिले. हे यश कांहीं एकट्या भाजपचे नव्हते. शिव सेना व महायुती च्या इतरही घटक पक्षांचे ते संयुक्त यश होते, हे सर्वांना मान्य करावेच लागेल.
तीन दशकांपासून शिवसेना भाजपची युती अभेद्य असल्याचे अभिवचन देत,आमच्या महायुतीला महाराष्ट्राच्या हितासाठी विजयी करा, असे कळकळीचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत होते. महायुतीची अभेद्य एकजुट विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची महाआघाडी असा राज्यात सामना रंगला.
निवडणुकीत २२५ च्या वर जागा मिळतील असा विश्वास ठेवणाऱ्या भाजप ला १०५ आणि शिवसेना ५६ जागा मिळून अपेक्षित यश जरी मिळू शकेल नाही तरी १६१ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवित निवडणूकीचा सामना महायुतीने जिंकला. महायुतीच्या बाजूने जनतेने आपला कौल दिला. महायुतीला १६१ जागांचा स्पष्ट बहुमतांचा जनादेश मिळाला.
पण हा जनादेश मान्य करुन विजय उत्सव महायुतीच्या नेत्यांना आणि आमदारांना मनापासून आनंद साजरा करता आला नाही. याचे काय कारण असेल याचा विचार केला तर भाजप मधील मुख्यमंत्री पदाची व पूर्ण सत्ता निरंकुश पणें काबीज करून प्रभुत्व गाजविणे ही वृत्ती हे एकमेव कारण समोर येते. गेली पाच वर्षे शिवसेना चे ६३ आमदार भाजपसोबत होते. भाजपचा जोडीदार भागीदार, भाऊ म्हणून राज्यकारभार करण्यात शिवसेना भाजप ला साथ देत होती . मागील विधानसभा निवडणुक २०१४ मध्ये शिवसेना भाजप वेगवेगळे लढले आणि नंतर सत्तेत एकत्र आले. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप महायुती करुन एकत्र लढले आणि निवडून आल्यावर पुन्हा वेगळे होण्याचे चिन्ह दिसत आहे. सत्तेत ५०:५० चा वाटा लोकसभेच्या निवडणुकीतच ठरला असताना आता मात्र सरळ नाकारणे, सध्या चर्चेला ही तयार नसणे व मुख्यमंत्रीपदासाठी १००% कब्जा सांगणे, हे युती धर्माला अशोभनीय आहेच पण वरुण शिवसेनेला दोष देत मीडिया मध्ये नकारात्मक संदेश देणे, हे फार क्लेशदायक आहे. दि. २४ ऑक्टोबर २०१९ ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. येत्या गुरुवारी दि. ८ नोव्हेंबरला निकाल लागून १५ दिवस पूर्ण होतील. तोपर्यंत सरकार महाराष्ट्रात स्थापन होईल, असे कोणतेही लक्षण दिसत नाही. शिवसेना आणि भाजप यांचे जणू जहाल द्वंद्व पेटलेले आहे, असे मीडिया मध्ये अंकित करणे, युती धर्माला तिलांजली देणेच आहे ! दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या लोभा पोटी भाजपा पार युती धर्म विसरुन गेलेत की आपण एकत्र युती करुन जनतेसमोर मतांचा जोगवा मागायला गेलो होतो. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महायुतीच्या हाती सत्ता द्या, ही जनतेसमोर केलेली याचना भाजप नेते विसरले आहेत. महाआघाडीपेक्षा महायुती बरी म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमताचा कौल दिला. पुन्हा महायुतीला सरकार स्थापन करण्याची संधी दिली.भाजप नेत्यांच्या डोळ्यांवर सत्तेच्या हव्यासाची एवढी धुंदी आहे की त्यांना शिवसेने चे अथक परिश्रम व जनतेने युती म्हणून दिलेली सुवर्ण संधी दिसत नाही. ५०:५० चा जग जाहीर केलेला सर्व मान्य फॉर्म्युला पाळून सरकार स्थापन करायची मिळालेली संधी, हे नेते वाया घालवित आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी भाजप च्या हव्यासाचे द्वंद्व एवढे पेटले आहे की तीन दशकांच्या युतीची माती होते की काय अशी शंका येते. सोन्यासारख्या महायुतीची होत असलेली माती पाहून भाजपाच्या या गंभीर विषय पुढे महाराष्ट्राच्या जनतेने कपाळाला हात लावला आहे. महायुतीला पुन्हा सरकार स्थापन करण्याची महाराष्ट्राच्या जनतेने संधी दिली मात्र हे मुठ भर नेते इतके करंटे निपजलेले पाहून त्यांना ज्यांनी मतदान केले त्यांना निश्चित पश्चाताप होत असेल. म्हणूनच राज्यात सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी खर्या अर्थाने वरिष्ठांनी हस्तक्षेप करावा,असे मी आवाहन केले आहे.
युतीला मिळालेले यश एकट्या भाजपचे नाही म्हणुनच सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी अत्यंत सरळ मार्ग म्हणजे ५०:५० चा जग जाहीर सर्व मान्य फॉर्मुला ..! कारण दोन्ही पक्ष महायुतीतून एकत्र निवडणूक लढले, त्यात भाजपला १०५ जागा जिंकता आल्या. त्यामुळे तो मोठा पक्ष ठरत नाही. पूर्वी जो फॉर्म्युला मान्य केला आहे, तो भाजपला युती धर्म म्हणून मानावाचं लागेल. त्यात कांहीं कमी पणा नाही. एक जुना भरवश्याचा सहकारी पक्ष म्हणून शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा मान त्याचबरोबर मंत्रीमंडळाचे खातेवाटप करताना शिवसेनेला महत्वाची खाती आणि सम समान मंत्रीपदे देण्यात काहीच गैर नाही. किंबहुना त्यात भाजपची प्रतिमा उंचावेल. मात्र ते पाळणे सोडून आता शिवसेनेला मीडिया व जगासमोर खलनायक सिध्द करण्यासाठी शक्ती खर्ची करण्यात धन्यता कसली ?
निवडणुकीचे वेळेस भाजप जनतेसमोर "आमचं ठरलंय - आमचं ठरलंय" असे ओरडून सांगत होती. या नेत्यांना जनतेचा सवाल आहे तुमचं नक्की काय ठरलंय? निवडणुकी नंतर शब्द फिरवून भांडायचं ठरलंय की एकत्र सरकार चालवायंच ठरलंय? "मी पुन्हा येईन" "मी पुन्हा येईन" अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटली होती , तो धागा पकडून आता सर्व राज्यभर पुन्हा देवेंद्रचा नारा दिला. शिवसेनेच्या अथक परिश्रमातून महायुतीने निवडणूका लढल्या आणि जिंकल्या. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा भाजपला कळले की आपण खोदलेल्या खड्ड्यात १०५ वर आऊट झालो आहोत. शिवसेना चे ५६ शिलेदार असल्याशिवाय भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही. ही अडचण ओळखून तरी शिवसेनेशी जुळवून घेण्याचे सोडून बंडखोरीची तलवार उपसली. पुन्हा देवेंद्र म्हणून मीडिया मधे द्वंद्व सुरु करून शिवसेनेला खलनायक ठरविले जात आहे. हे अनाकलनिय व अशोभनीय आहे.
संजय राऊत शिवसेनेचे योद्धे हाती लेखणीची तलवार आणि जिव्हेतून वाक्बाण भाजपवर चालवू लागले, तर आता यांना आग होत आहे. दोन्ही कडून घनघोर युद्ध सुरु आहे, असे भासवून ५०:५० च्या सर्व मान्य जग जाहीर फॉर्म्युला वर चादर झाकणे सुरू आहे. मुख्यमंत्रीपद लक्ष्य आहे. मुख्यमंत्रीपदासाठी युती धर्म सोडून अक्षरशः करो या मरो या आवेशात ते लढत आहेत. भाजपाची मुख्यमंत्रीपदाची लालसा व महत्वाकांक्षा आम्हाला मान्य आहे, मात्र मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेशी जे लढणे सुरु आहे ते लढणे नसून कपटी डाव आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी युती धर्म सोडून चालविलेला रडीचा डाव थांबवावा.
५०:५० फॉर्म्युला मान्य नव्हता तर व पुन्हा द्वंद्व करायचे होते तर निवडणूक प्रचारापूर्वीच घोषित करायच होत. "आमचं ठरलंय!!" हे कोड्यात बोलण्यापेक्षा "काय ठरलं?" ते तेव्हाच निवडणूक प्रचारात भाजपने स्पष्ट करायला पाहिजे होते. मुख्यमंत्रीपदाची आपली महत्वकांक्षा देवेंद्रने "आमचं जमल!!" या घोषणेच्या पदराआड लपू द्यायची नव्हती. "काय ठरलं" ते लेखी घेऊन जनतेसमोर मांडायचे होते. अडीच-अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद शिवसेना भाजपने वाटून घेण्याचे ठरले होते. आता म्हणायचं "मुख्यमंत्रीपदाबाबत असे ठरलेच नव्हते " हे किती लज्जास्पद आहे. त्यानंतर बहुमतासाठी आपल्या परीने आकडे जमविण्याचा आकड्यांचा खेळ सुरु करणे, सत्तेचा वापर करून अपक्षाना खुट्याशी बांधणे, चक्क भाई ठाकूर शी हात मिळविणे, असुरुद्दिन ओवैसी ला ओवाळणी घालणे व बहुमताच्या आकड्यांच्या खेळात शिवसेना कशी खलनायक आहे,हे मीडिया मधून जगासमोर नकारात्मक अंकित करणे, हे सर्व युती धर्म सोडून वागणे नव्हे काय ? निवडणूक झाली की शिवसेना भाजपमधला संवाद संपला. ही फार क्लेशदायक बाब आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला की भाजपला या प्रश्नाभोवती महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा तिढा वाढत चालला आहे. त्यावर सातारचे राजे उदयनराजे भोसले यांनी शिवसेना भाजपचे ठरत नसेल तर मुख्यमंत्रीपदी रामदास आठवलेंची वर्णी लावून सरकार स्थापनेचा तिढा सोडवावा,अशी मिश्किलपणे मागणी करणे व त्यावर व्यंग करून भाजपने हास्य पसरविणे फार दुःखदायक आहे. तीस वर्षांपूर्वी झालेली युती नाकरण्या सारखे आहे. भाजपला हे शोभणारे नाही. म्हणूनच मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाने जास्त ताणू नये. युतीची माती करु नये. सत्तेची सुवर्ण संधी वाया घालवू नये. ५०:५० चा फॉर्म्युला मान्य नव्हताच तर लोकसभे पूर्वीच कां जाहीर केले नाही? शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे नव्हते तर त्यांनी स्वबळावर स्वतंत्र लढले पाहिजे होते. युतीत शिवसेनेच्या बळावर लढलेल्या निवडणुकीच्या सामन्याचा भाजपा शतकवीर आहे,असे म्हणून सामनावीर आहे, असे भासवून शिवसेनेने आता उपकर्णधारपदावर समाधान मानले पाहिजे, हे ढासून सांगणे म्हणजे ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे, अशी वृत्ती कोणी ठेवू नये. पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगत तसा प्रचार केला, त्याला त्यावेळी शिवसेनेने हरकत घेतली नाही, मग आता शिवसेना पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी का हरकत घेत आहे? हे म्हणणे साफ चुकीचे आहे. युती धर्म सोडून आहे. जनतेचा विश्वास घात आहे !
शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे युतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन चाललेला पोरखेळ थांबवावा. खरे तर शिवसेना भाजप वेगवेगळे लढले असते तर या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे पानिपत झाले असते. महायुती म्हणून एकत्र लढल्यामुळे त्यांना बहुमत मिळाले आहे, याची जाणिव ठेवून सत्ता स्थापनेची मिळालेली सुवर्णसंधी भाजपने वाया घालवू नये. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात दंड थोपटले त्यांच्यासमोर सत्ता टाकण्यात कसला आला आहे सच्चेपणा? आता वेळ न दवडता भाजपाने मुख्यमंत्रीपदासाठीचे द्वंद्व थांबवावे आणि शिवसेना प्रमुखांना संधी द्यावी हीच महाराष्ट्राची इच्छा आहे....!
- *किशोर तिवारी
(अध्यक्ष - कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन , महाराष्ट्र राज्य )*
+919422108846
kishortiwari@gmail.com
No comments:
Post a Comment